गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे फुल्ल; अवघ्या एका मिनिटात सर्व तिकीटे संपली

कोकणातील शिमगा आणि गणेशोत्सव हे मोठे सण आहेत. या दोन्ही सणांना मुंबईतील अनेक चाकरमानी कोकणात जातात. त्यामुळे याकाळात रेल्वेचे आरक्षण फुल्ल होते. एसटी, खासगी बस मिळेल त्या वाहनाने चाकरमानी कोकण गाठतात. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष कोकण रेल्वेचे आरक्षण कधी सुरू होणार याकडे असते. कोकण रेल्वेने मंगळवारी गणेशोत्सवाच्या हंगामासाठी आरक्षण सुरू केले. आरक्षण सुरू होताच अवघ्या एका मिनिटातच सर्व तिकीटे संपली. त्यामुळे अनेक चाकरमान्यांच्या पदरी निराशा पडली आहे.

अवघ्या 63 सेंकदात वेटिंग लिस्ट पाचशे पार गेली आहे सर्व गाड्या एका मिनिटांत आरक्षित झाल्या. यामुळे प्रवाशांनी तिकीट आरक्षण प्रक्रियेत गैरप्रकाराचा आरोप केला आहे. 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे. त्याच्या तीन दिवस आधी म्हणजे 4 सप्टेंबर रोजीचे आरक्षण 7 मे रोजी सकाळी 8 वाजता सुरू झाले आणि अवघ्या 63 सेकंदांत कोकणकन्या एक्स्प्रेसची वेटिंग लिस्ट 580 पर्यंत पोहचली. कोकणकन्यासह इतर ट्रेन्सचे बुकिंगही फुल्ल झाले आहे.

आरक्षणाच्या दिवसापूर्वी त्याआधीच्या 120 दिवसांपासून रेल्वेची तिकीट आरक्षण प्रक्रिया सुरू होते. कोकणकन्या एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी अवघ्या 63 सेकंदात 500 पार गेली होती. गणेशोत्सवासाठी गावी जाण्याचा निर्धार केलेले हजारो चाकरमानी तीन महिने अधिपासूनच गावी जाण्या-येण्याचे नियोजन करत असतात. त्यासाठी रात्रभर जागून आरक्षण सुरू होण्याची वाट बघतात. मात्र, अवघ्या एका मिनिटात सर्व बुकींग फुल्ल झाल्याने अनेकांची निराशा झाली आहे.

रेल्वे तिकीटाची अवैध विक्री करणारे दलाल मोठ्या संख्येने तिकीटांचे आरक्षण करुन ते चढ्या दराने विक्री करत असल्याचा आरोप होत आहे. सण-उत्सवाला चाकरमानी गावी जातात, त्यावेळीच दलालांकडून मोठ्या संख्येने आरक्षण करुन चढ्या दराने विक्री करण्याचे रॅकेट सुरु आहे. गेल्या वर्षी गणेशोत्सवातील रेल्वे तिकिटांचा काळाबाजार उघडकीस आला होता.