उष्णतेच्या लाटेचा अलर्ट, कोकणासह मुंबई तापणार; मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता

राज्यातील हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. एन उन्हाळ्यात राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मात्र, राज्यात काही भागात तापमानाचा पारा चढत आहे. त्यामुळे राज्यात सध्या उन-पावसाचा खेळ सुरू असल्याचे दिसत आहे.

कोकणसह मुंबई आणि उपनगरात वाढत्या उकाड्याने नागरिक त्रस्त आहेत. राज्याच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे, तर काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच काही भागात गारपीट होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, मुंबईसह कोकणातील तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर, हातकणंगले येथे तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात पुढील तीन दिवस अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांसाठी 10 मे पर्यंत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.