ठाण्यात मिंधेंचे म्हस्केंना भर मेळाव्यात टोचन;नगरसेवक, आमदारांसह महापालिकेच्या कामात ढवळाढवळ करू नका

ठाणे लोकसभा मतदारसंघातील मिंधे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी टिपटॉप प्लाझा येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हस्के यांच्या अडचणींमध्ये आणखी भर टाकली आहे. खासदारकीचे उमेदवार आहात, जुना स्वभाव बदला, नगरसेवक, आमदारांसह महापालिकेच्या कामांमध्ये आडकाठी आणू नका, अशा कानपिचक्या शिंदेंनी म्हस्के यांना दिल्या. सर्वांसमोर होत असलेले हे कौतुक पाहून म्हस्के यांचा चेहरा पडला तर सभागृहात मोठा हशा पिकला. शिंदेंनी अप्रत्यक्षपणे म्हस्के यांच्या स्वभावाचा प्रचार केल्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ठाणे शहरात होत असलेल्या कामांमध्ये नरेश म्हस्के यांच्याकडून ढवळाढवळ केली जाते हे जगजाहीर आहे. त्यामुळे अनेक नगरसेवक त्यांच्यावर नाराज आहेत. त्यांच्या या हावऱ्या वृत्तीमुळे बहुतेक जण दुखावले गेले आहेत. भाजपचे आमदार संजय केळकर आणि त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांनी म्हस्के यांच्याकडून होत असलेल्या ढवळाढवळीची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली होती. म्हस्के यांच्या या स्वभावावर शिंदे यांनी सोमवारी टिपटॉप प्लाझा येथे झालेल्या मेळाव्यात शिक्कामोर्तब केले. माझा स्वभाव बदलणार नाही, मी आहे तसाच राहणार असे वक्तव्य यावेळी म्हस्के यांनी केले होते. त्याचाच धागा पकडून शिंदे यांनी त्यांच्या खऱ्या स्वभावाची ओळख ठाणे शहरासह नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर शहरातील पदाधिकाऱ्यांना करून दिली. त्यामुळे म्हस्के यांच्या स्वभावाची चर्चा ठाण्यासह मीरा-भाईंदर आणि नवी मुंबईतही सुरू झाली आहे. शिंदे यांच्याकडून स्वभावाचा पंचनामा झाल्यामुळे त्याचा जोरदार फटका म्हस्के यांना निवडणुकीत बसणार आहे.

विचारे यांच्या हॅट्रिकचा मार्ग मोकळा
म्हस्के यांच्या उलट शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांचा स्वभाव आहे. तिन्ही महापालिकांमध्ये विचारे यांनी गेल्या दहा वर्षांत कोणाच्याही कामात आडकाठी आणलेली नाही. सर्वच पक्षांचे पदाधिकारी आणि नेत्यांच्या सुखदुःखात ते नेहमीच सहभागी झाले आहेत. त्यामुळे विचारे यांना अनेक घटकांनी छुपा पाठिंबा दिल्याने त्यांच्या खासदारकीच्या हॅ‌ट्ट्रिकचा मार्ग मोकळा झाला आहे.