मध्य रेल्वेचे नियोजन फसफसले, हार्बरवरील 38 तासांचा ब्लॉक, 45 तासांवर गेल्याने प्रवाशांचे हाल

पनवेल स्थानकातील डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या कामासाठी मध्य रेल्वेने बेलापूर-पनवेल दरम्यान शनिवारी रात्री 11 वाजल्यापासून तब्बल 38 तासांचा ब्लॉक घेतला होता. नियोजित वेळेनुसार सदरचा ब्लॉक आज दुपारी 1 वाजता संपने अवश्यक होते. मात्र मध्य रेल्वेचे नियोजन फसफसल्याने 38 तासांचा ब्लॉक 45 तासांवर गेला. तब्बल सात तास ब्लॉक लांबल्याने प्रवाशांची प्रचंड लटपंती झाली.

मध्य रेल्वेने आपल्या नियोजित कामासाठी 38 तासांचा ब्लॉक घेताना तो सोमवारी दुपारी संपणार असल्याचे जाहीर केले होते. दोन दिवस बेलापूर-पनवेल दरम्यान लोकल नसल्याने हजारो प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागल्याने त्यांची मोठी गैरसोय झाली होती. मात्र आज दुपारी ब्लॉक संपणार असल्याने अनेकांनी बेलापूर-पनवेल दरम्यान आपल्या प्रवासाचे नियोजन केले होते. चाकरमानीही पनवेलला पोहोचण्यासाठी ब्लॉक संपल्यानंतर येणाऱया पनवेल लोकलची वेगवेगळ्या स्थानकांत वाट पाहत होते. मात्र रेल्वेचे पनवेल स्थानकातील नियोजित काम वेळेत पूर्ण न झाल्याने ब्लॉक सायंकाळी साडे सहा-सात वाजेपर्यंत वाढवण्यात आला. त्याबाबत सुरुवातीला रेल्वेकडून कोणतीच उद्घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच लटपंती झाली.

ब्लॉक संपल्यानंतर पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी पहिली गाडी सायंकाळी 7.20 वाजता सुटली. तर सीएसएमटीहून पनवेलसाठी पहिली गाडी 6.45 वाजता सोडण्यात आली.