अशोक गहलोत यांचा PM मोदींवर हल्लाबोल, मंगळसूत्र मुद्द्यावरून म्हणाले…

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राजस्थानमध्ये 13 मतदारसंघात मतदान सुरू आहे. जोधपूरमध्ये राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही आपल्या कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी अशोक गहलोत यांनी माध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळसुत्राबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून हल्लाबोल केला. भाजपची परिस्थिती वाईट असल्याने ते फक्त खोटे पसरवत आहेत. आता हे लोक कधीच 400 पारचा नारा देणार नाहीत, असे अशोक गहलोत म्हणाले.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार टीका करत आहेत. त्यांच्या याच वक्तव्यावरून गदारोळ माजला आहे. आम्हाला मंगळसुत्रावर नाही तर, देशाच्या विकासावर निवडणूक लढवायची आहे. मोदी जाणूनबुजून मंगळसूत्र खेचून नेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी अशाप्रकारे बोलतील, यावर विश्वास बसत नाही. आतापर्यंत लोक मोदींवर विश्वास दाखवत होते. मात्र पहिल्यांदा त्यांनी अशाप्रकारची भाषा वापरली आहे, अशी टीका अशोक गहलोत यांनी केली.

‘काँग्रेसने लोकांच्या कष्टाने कमावलेला पैसा आणि मौल्यवान वस्तू घुसखोरांना व ज्यांना जास्त मुले आहेत त्यांना देण्याची योजना आखली आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास माता-भगिनींचे सोने, मंगळसूत्र हिसकावून घेतील’, असा आरोप राजस्थानमध्ये एका सभेत पंतप्रधान मोदींनी केला केला होता. त्यामुळे मोदींनाच याचा फटका बसला आहे. लोकांना समजू लागले आहे की, ते जे काही बोलतात ते खरे नसते. मोदींनी पहिल्यांदा बासवाडा आणि टोक येथे मंगळसुत्राबाबत वक्तव्य केले होते, असे गहलोत पुढे म्हणाले.

‘भाजपची परिस्थिती बिकट आहे आणि राज्यातील निवडणुकीचा निकाल आमच्या बाजूने लागेल, असा विश्वास आहे. देशात अशा वातावरणात निवडणुका होत आहेत, जेव्हा दोन-दोन मुख्यमंत्री तुरुंगात आहेत. आता भाजप अबकी बार 400 पारचा नारा विसरला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा आता कधीच अबकी बार 400 पारचा नारा देणार नाहीत. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीनंतर ते हा नारा विसरले आहेत. आता ते घाबरतात’, असा टोला अशोक गहलोत यांनी लगावला.