विखेंविरोधातील भाजपमधील नाराजी उघड; पदाधिकाऱ्यांनी थेट गिरीश महाजनांपुढे मांडल्या तक्रारी

sujay-vikhe-patil

नगर लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार सुजय विखे यांच्यावर जनतेचा रोष आहे. त्यांनी दिलेली कोणतीही आश्वासने पूर्ण केली नाहीत. तसेच त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही डावलले. त्यामुळे नगरमध्ये विखे यांच्याविरोधात वातावरण होते. तरीही भाजपने विखे यांनाच उमेदवारी दिल्याने भाजपमधील अनेकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. तसेच विखे यांच्या प्रचारासाठी भाजपचे कार्यकर्ते सक्रीय नसल्याचे दिसत आहे. त्यातच आता भाजप पदाधिकाऱ्यांनी थेट गिरीश महाजन यांच्यासमोरच विखेंबाबत तक्रारी केल्याने विखे यांना ही निवडणूक जिंकणे कठीण झाल्याची चर्चा आहे.

विखे कुटुंबियांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कशा प्रकारची वागणूक दिली. लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक घडामोडी पक्षाविरोधात घडल्या, याबाबत गिरीष महाजन यांना स्थानिक पदाधिकार्‍यांनी माहिती देत विखेंविरोधात अनेक तक्रारी केल्या. भाजपने सुजय विखे यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर भाजपमध्ये अस्वस्थता होती. राम शिंदे व भनुदास बेरड हे इच्छुक होते. तरीही पक्षाने पुन्हा विखेंना उमदेवारी दिल्यानंतर पक्षातील जेष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते नाराज झाले. विखे यांनी गेल्या पाच वर्षात कार्यकर्त्यांना विचारले नाही, सन्मानाची वागनून दिली नाही, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. राम शिंदे यांनी नाराजी दुर करण्यासाठी राधाकृष्ण विखे यांना उपमुख्यमंत्री फडणवीस यांची मदत घ्यावी लागली. त्यानंतर आता राम शिंदे हे प्रचारात सहभागी झाले आहे.

जे जुने कार्यकर्ते आहेत त्यांना विचारात घेणे गरजेचे होते. आजही पदाधिकार्‍यांना म्हणावे असे स्थान दिले जात नाही किंवा विचारात घेतले जात नाही म्हणून विखेंविरोधात नाराजी आहे. गिरीश महाजन सातार्‍याकडे जात असताना नगरमध्ये थांबले असता काही पदाधिकार्‍यांची त्यांची भेट घेत विखेंविरोधातील तक्रारी मांडल्या. महाजन यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. ही बाब वरिष्ठांकडे मांडू असे सांगत महाजन यांनी यावर बोलणे टाळले.