T20 World Cup 2024 : वर्ल्डकपवर दहशतवादी हल्ल्याचे सावट, पाकिस्तानातून वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाला मिळाली धमकी

टी-20 विश्वचषक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन देशांमध्ये विश्वचषकाचे सामने खेळवले जाणार असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे. असे अतानाचा या स्पर्धेदरम्यान एक मोठा दहशतवादी हल्ला करण्यात येणार असल्याची धमकी पाकिस्तानातील दहशतवाद्यांकडून वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाला  देण्यात आली आहे.

टी-20 विश्वचषक 1 जून ते 29 जून असा तब्बल एक महिना रंगणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन्ही देशांनी कंबर कसून आयोजनाची तयारी केली आहे. मात्र आता वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाला आलेल्या धमकीमुळे विश्वचषकावर दहशतवादी हल्ल्याचे सावट निर्माण झाले आहे. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, प्रो-इस्लामिक स्टेटने व्हिडीओ मेसेज पाठवला आहे. यासंदर्भात क्रिकेट वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचे सीईओ जॉनी ग्रेव्हज यांनी माहिती दिली. “प्रो-इस्लामिक स्टेटने विश्वचषकादरम्यान हल्ल्याची योजना आखली आहे. आयएस संघटनेच्या अफगाणिस्तान-पाकिस्तान शाखेकडून एक व्हिडिओ मेसेज पाठवला आहे. या व्हिडिओमध्ये काही देशांमध्ये हल्ले करणार असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे, ” अशी माहिती जॉनी ग्रेव्हज यांनी दिली.

ICC Women’s T20 World Cup 2024 : वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी हिंदुस्थान भिडणार पाकिस्तानला

“आम्ही यजमान देश आणि शहरांमधील अधिकाऱ्यांसोबत मिळून काम करत आहोत. कोणतीही जोखीम निर्माण झाली तर ती जोखीम कमी करण्यासाठी आमच्याकडे योग्य योजना आहेत. त्याची खात्री करण्यासाठी आम्ही जागतिक परिस्थितीचे सतत निरीक्षण आणि मुल्यांकन करत आहोत,” असे जॉनी ग्रेव्हज यांनी क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.