ज्या स्वातंत्र्यासाठी लढलो होतो तेच स्वातंत्र्य बदलायला भाजप निघाली आहे, आदित्य ठाकरे यांचा घणाघात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांची सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथील गंगापूर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ आले होते. यावेळी झालेल्या सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी भाजप व मिंधे गटावर सडकून टीका केली. भाजप संविधान बदलून आपलं स्वातंत्र्या हिरावू पाहत आहे. ज्या स्वातंत्र्यासाठी आपण लढलो तेच स्वातंत्र्य बदलायला भाजप निघाली असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

”भाजपवाले घरी प्रचाराला येतात व लोकांना विचारतात शिवसेनेला का मत का देताय. भाजप चारशे जागा जिंकणार आहे मग तुम्ही तुमचं मत दुसऱ्याला का देतायत असा आभास तयार करतात. पण असं सांगणारं जर कुणी तुमच्याकडे आलं तर त्यांना चहा द्या आणि चारशे पार कसं करणार ते विचारा. भाजप चंद्रावर, दुसऱ्या ग्रहावर चारशे पार जाऊ शकेल, चीन मध्ये जाऊन चारशे पार होतील यांचे पण हिंदुस्थानात याचे चारशे पार होऊच शकत नाही. चारशे काय हे दोनशे पार देखील जाऊ शकत नाही. दक्षिण हिंदुस्थानातील एकाही राज्यात हे जिंकणार नाहीत. मग चारशे पार येणार तरी कसे? तसंच मध्य, इशान्य हिंदुस्थानातही यांच्या जागा येणार नाही. बिहारमध्येही भाजप कमी होतेय. कश्मीरमध्ये 370 कलम काढलं. 370 कलम काढल्यानंतरही अजूनही परिस्थिती बदलेली नाही. आतंकवाद संपला नाही. दोन दिवसांपूर्वी एअरफोर्सच्या ताफ्यावर हल्ला झाला. एवढे चेकिंग सुरू असताना एअर फोर्सच्या ताफ्यावर हल्ला होतोच कसा हे भाजपने सांगाव. आज त्याच कश्मीरमध्ये भाजप निवडणूक लढवायला तयार नाही. लडाख मध्ये 30 ते 40 हजार लोकं रस्त्यावर आहेत. सोनम वांगचूक लडाखसाठी लढा देत आहेत. 2019 ला भाजपकडून जे लडाखमध्ये निवडून आले होते. ते आता निवडणूक लढणार नाहीत बोलतात. बिहारमध्ये तेजस्वी यादव लढत आहेत, दिल्लीत केजरीवालांना ज्या प्रकारे अटक करण्यात आली आहे त्यामुळे तेथील जनता संतापली आहे. तिथल्या सातही जागा इंडिया आघाडी जिंकणार मग कसे हे चारशे पार जाणार. महाराष्ट्रातील 48 मधून जास्तीत जास्त जागा आपल्याच येणार. देवेंद्र फडणवीसांना जे आपले राजकारण घाणेरड़ं करून ठेवलेलं आहे ते कुणालाच पटलेलं नाही, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.

” आज निर्मला सितारामन सांगतायत आम्हाला चार जातींचा शोध लागला. शेतकरी, युवा, महिला, गरीब आम्ही या चार जातींची सेवा करू. यांनी दहा वर्ष सत्ता गाजवली. आता दहा वर्षांनी यांना शोध लागलाय या चार जातींचा. दोन अडीच वर्षात यांनी आपल्या राज्याची हालत कशी केली आहे. राज्यात अवकाळी झाली, गारपीट झाली कधीतरी राज्याचे कृषी मंत्री कधी तुमच्यात फिरताना दिसले आहेत का. कधी मदतीला आले नाहीत. हे असं मिंधे सरकार आहे. देशातले शेतकरी आपल्या हक्कासाठी मोर्चा घेऊन गेले होते. त्यांच्या मोर्च्याला दिल्ली बॉर्डरवर थांबवलं गेलं. अन्नदात्यावर हल्ला झाला, गोळीबार झाला. अशा अत्याचारी भाजपला तुम्ही मतदान करू शकणार का? आज आपल्या महाराष्ट्रावर अन्याय होत आहे. कितीतरी उद्योग गुजरातला नेले जात आहेत. वर्ल्डकपची फायनल गुजरातला. का एवढे अत्याचार माझ्याच महाराष्ट्रावर होतोय. आपल्या महाराष्ट्राच्या तरुणांच्या हातातला घास जो घेताय तिथे मी तुम्हाला नडणार आणि तुमच्याविरुद्ध लढणार म्हणजे लढणारच, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी भाजपला दिला.