यवतमाळ शहरात मतदान न करण्यासाठी पैसे वाटप, भरारी पथकाने रंगेहात पकडल्यानंतर आरोपी पसार

>> प्रसाद नायगावकर

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात यवतमाळ येथे मतदारांच्या बोटाला शाई लावून त्यांना पैशाचे वाटप करून मतदानापासून वंचित ठेवल्या जात असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला आहे. छोटी गुजरी परिसरामध्ये भाजपची काही मंडळी एका रजिस्टरवर मतदारांची नावे लिहीत होती व त्या मतदारांच्या हाताच्या बोटाला शाही लावून त्यांना पैशांचे वाटप केले जात होते. विशिष्ट भागातील हे मतदार मतदान करू नये असा प्रकार सुरू होता याबाबत तक्रार केल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक विभागाच्या भरारी पथकासह त्या ठिकाणी छापा मारला असता भाजपची मंडळी त्या ठिकाणाहून पळून गेली. मात्र बोटाला लावल्या जात असलेली शाई, ब्रश आणि मतदारांच्या नावांचे रजिस्टर भरारी पथकाच्या हाती लागले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याची कारवाई सुरू आहे.