मोदी घाबरले आहेत; काही दिवसांनी भाषणादरम्यान रडतानाही दिसतील, राहुल गांधींचा हल्लाबोल

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी शुक्रवारी मतदान पार पडत आहे. देशभरातील 88 जागांवर मतदान होत असून लोकशाहीच्या उत्सहामध्ये लोकं मोठ्या उत्साहाने सहभागी होताना दिसत आहेत. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकमध्ये एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. लोकसभा निवडणूक हातातून निसटत चालल्याने मोदी घाबरले असून काही दिवसांनी ते मंचावर भाषणादरम्यान रडतानाही दिसतील, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला.

काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणादरम्यान घाबरल्याचे दिसत आहेत. आगामी काळात ते मंचावर रडतानाही दिसू शकतात. मोदी 24 तास तुमचे लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न करत असून एखाद दिवशी ते पाकिस्तान आणि चीनवर बोलतील, तर एखाद दिवशी तुम्हाला थाळ्या वाजवायला सांगितली आणि मोबाईलचा फ्लॅश लाईट ऑन करायला सांगतील, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला. ते कर्नाटकमधील बिजापूर येथे एका सभेला संबोधित करत होते.

नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षांमध्ये गरिबांचे पैसे हिसकावून घेतले. देशातील 70 कोटी जनतेकडे जेवढा पैसा आहे तेवढा पैसा त्यांनी 22 लोकांना दिला. देशातील 40 टक्के संपत्तीवर 1 टक्के लोकांचे नियंत्रण आहे. काँग्रेस पक्ष बेरोजगारी, महागाई मिटवून तुमचा हिस्सा तुम्हाला देईल. चेवढा पैसा नरेंद्र मोदींनी अब्जोपतींना दिला, तेवढा पैसा आम्ही हिंदुस्थानातील गरिबांना देऊ, असेही ते म्हणाले.

मोदींनी गेल्या 10 वर्षात 20 ते 25 लोकांना अब्जाधीश बनवले. त्यांना एअरपोर्ट, पोर्ट, वीज, खाणी, सौरउर्जा प्रकल्प, डिफेन्स सेक्टरमधील टेंडर सर्वकाही अदानी आणि त्यांच्यासारख्या अब्जाधीशांना दिले. परंतु गरिबांना काहीही दिले नाही, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.