मुंबई, ठाणे, रायगडमध्ये पाच दिवस उष्णतेची लाट; हवामान विभागाचा इशारा

मुंबई, ठाणे, रायगडसह, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी पुढचे पाच दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह गारपीट आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात आज बहुतांश भागांत पारा चाळिशीपार गेलेलाच दिसला, तर मुंबईत 36 अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली

 नागरिकांनी सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडू नये. भरपूर पाणी प्यावे. उष्माघाताचा त्रास जाणवण्याची शक्यता असल्याने शक्यतो घराबाहेर पडू नये. लहान मुलांना घराबाहेर नेऊ नये. शाळेत जाताना टोपी, महिलांनी डोक्याला आणि तोंडाभोवती स्कार्फ गुंडाळावा, असे आवाहन डॉक्टर तसेच हवामान विभागाने केले आहे.

मुंबई, ठाणे आणि उपनगरात आज उन्हाचे चटके जाणवले. तर गुजरात आणि राजस्थानकडून येणारे उष्ण वारे अरबी समुद्रावरून मुंबई, महाराष्ट्राच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे वातावरणात प्रचंड आर्द्रता असल्याने अंगातून अक्षरशः घामाच्या धारा वाहत असल्याचे चित्र आहे. मुंबईत अनेक ठिकाणी 36 अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली, तर ठाण्याचा पारा 39 वर गेला.

देशात येथे उष्णतेची लाट

पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा आणि उत्तर प्रदेशात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर पंजाब आणि हरयाणात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असून कश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये तुफान बर्फवृष्टीची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

या ठिकाणी पाऊस

गेल्या आठवडय़ापासून विदर्भ, मराठवाडय़ात पावसाने हजेरी लावली. राज्यात काही जिह्यांमध्ये सलग दोन ते तीन दिवस पावसाची रिमझिम सुरू आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशीव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या भागात पावसाचा अंदाज आहे. तर पुणे, नगर, जालना, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिह्यांना पावसाने ‘यलो अलर्ट’ जारी केला.