वर्षा बंगल्यावरील राजकीय बैठका; 22 एप्रिलला निवडणूक आयोगापुढे सुनावणी

निवडणूक आचारसंहितेच्या काळात वर्षा बंगल्यावर राजकीय बैठक आयोजित करून आचारसंहितेचा भंग केल्याच्या तक्रारीवर निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोगाने काँग्रेस नेते सचिन सावंत यांना 22 एप्रिल रोजी सुनावणीला बोलावले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी राजकीय बैठक झाल्याची तक्रार काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी एक्सच्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीवर निवडणूक आयोगाने मुख्यमंत्र्यांच्या दोन अधिकाऱयांना नोटीस पाठवली होती. या नोटीसवर मुख्यमंत्र्यांच्या दोन अधिकाऱयांनी निवडणूक आयोगाला खुलासा पाठवला आणि अशी कोणतीही राजकीय बैठक झाली नसल्याचा खुलासा
केला होता.

पण या स्पष्टीकरणावर सचिन सावंत यांनी खेद व्यक्त केला होता. या बैठकीच्या संदर्भात खुलेआम सार्वजनिक असलेले पुरावे माझ्याकडे मागण्यात काय अर्थ आहे अशा शब्दात सचिन सावंत यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे अखेर राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱयांनी सचिन सावंत यांना त्यांचे म्हणणे मांडण्यास  बोलावले आहे.