‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेसाठी सिनी शेट्टी तयार

यंदाची मिस वर्ल्ड स्पर्धा हिंदुस्थानात होणार आहे. तब्बल 28 वर्षांनंतर आपल्या देशाकडे यजमानपद आले आहे. स्पर्धेत सिनी शेट्टी हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करत आहे. यापूर्वी ही स्पर्धा 1996 मध्ये बंगळुरू येथे झाली होती.

मिस वर्ल्ड स्पर्धा 18 फेब्रुवारी ते 9 मार्चदरम्यान पार पडेल. जगभरातून 120 सौंदर्यवती सहभाग घेतील. अंतिम फेरी 9 मार्च रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर येथे होईल. स्पर्धेबद्दल सिनी शेट्टी म्हणाली, ‘‘मिस वर्ल्डचे उद्दिष्ट नेहमीच ब्युटी विथ अ पर्पज असे राहिले आहे. केवळ सौंदर्यच नाही, तर उद्देशदेखील महत्त्वाचा आहे. जगभरात शांतता पसरवणे, मानवतेचे हित जपणे अशी स्पर्धेची उद्दिष्टय़े आहेत. आपल्या देशात आधुनिकीकरण आणि परंपरा यांचा मिलाफ आहे. ही परंपरा पाहण्याची, अनुभवण्याची संधी स्पर्धकांना मिळेल,’’ असे सिनी शेट्टी म्हणाली.

आतापर्यंत हिंदुस्थानातील सहा सुंदरींनी मिस वर्ल्डचा ताज जिंकला आहे. रीटा फारियांनी 1966 मध्ये पहिल्यांदा मिस वर्ल्डचा ताज जिंकला होता. त्यानंतर 1994 मध्ये ऐश्वर्या राय, 1997 साली डायना हेडन, 1999 साली युक्ता मुखी, 2000 मध्ये प्रियांका चोप्रा, 2017 मध्ये मानुषी छिल्लर यांनी मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता.