महाशक्तीचे गोडवे सुरू होताच गर्दी पांगू लागली; बारामतीतून सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी पुण्यात आयोजित महायुतीच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू केले. त्यांच्याकडून महाशक्तीचे गोडवे सुरू होताच कंटाळून लोकांनी सभेतून काढता पाय घेतला. गर्दी पांगायला सुरुवात झाल्याचे लक्षात येताच मुख्यमंत्र्यांनी लगेच भाषण आटोपले.

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा पवार यांनी आपला अर्ज दाखल केला. याकेळी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार मेधा कुलकर्णी, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, हर्षवर्धन पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी जिल्हा परिषदजवळ महायुतीची सभा पार पडली. सभेच्या शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणाला सुरुवात केली. चिठ्ठीतून वाचून आणि रटाळ भाषणामुळे लोक कंटाळले. त्यांनी महाशक्तीचे गोडवे सुरू करताच लोकांची चुळबुळ सुरू झाली. कंटाळल्यामुळे कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या नावाने घोषणा देण्यास सुरुवात करत सभेतून बाहेर पडायला सुरूवात झाली. गर्दी पांगायला लागल्याचे लक्षात येताच मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषण संपवले. त्यानंतर सभा संपून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्वजण रवाना झाले.

फडणवीस यांच्यासमोर नक्की काय ठरलं!

गेल्या काही दिवसात महायुतीतील बिघाडी आणि नंतर झालेल्या तडजोडीचा उल्लेख करून अजित पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ज्या ज्या गोष्टी ठरल्यात त्या पूर्ण करण्याचा शब्द आजच्या सभेच्या निमित्ताने मी सगळ्यांना देतो, असा शब्द अजित पवार यांनी यावेळी दिला. खणखणीत मत द्या आणि काम वाजवून घ्या, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे अजित पवार यांनी फडणवीस यांच्यासमोर नक्की काय ठरवले अशी कुजबुज सुरू झाली होती.

अजित पवारांचा आधी डमी अर्ज, मग सुनेत्रा पवार यांनी भरला अर्ज

सभा संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा विधान भवन परिसरात पोहोचला. अजित पवार यांनी सुरुवातीला डमी अर्ज दाखल केला. त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांचा कालावधी होऊनही सुनेत्रा पवार अर्ज दाखल करण्याच्या ठिकाणी हजर न झाल्याने अजित पवार यांची अस्वस्थता वाढली. त्यामुळे अजित पवार हे तातडीने बाहेर येऊन गाडी काढण्यास त्यांनी सांगितले. सुनेत्रा पवार यांना गर्दीमुळे विधान भवन परिसरात येण्यास उशीर झाला होता. त्यामुळे अजित पवार यांनी स्वत: त्यांच्या गाडीपर्यंत जाऊन त्यांना सोबत गाडीत घेऊन आले. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.