WebSeries Review – तरुणाईच्या आत्मशोधाचा रंजक प्रवास – शांतीत क्रांती 2

>> रश्मी पाटकर 

तरुण पिढी हा सर्वसाधारणतः प्रत्येक आधीच्या पिढीसाठी चर्चेचा, टीकेचा आणि क्वचित कुचाळक्या करण्याचा विषय ठरत आली आहे. आमच्या वेळी बाबा असं नव्हतं म्हणणारी प्रत्येक आजची पिढी तिच्या तरुणपणात अशा नैतिक-सामाजिक फुटपट्ट्यांना सामोरी गेलेली असते. फक्त फरक इतकाच असतो की काळानुसार प्रत्येक पिढ्यांसमोरची आव्हानं, त्यांचे आयाम बदलतात. त्यामुळे जनरेशन गॅप नावाची दरी निर्माण होते. इतकं सगळं सांगायचं कारण म्हणजे सोनी लिव्हची नुकतीच प्रदर्शित झालेली वेबसिरीज ‘शांतीत क्रांती 2’. आजचे तीन वाट भरकटलेले, व्यसनं जडलेले, चंगळवादी तरुण आणि त्यांची, त्यांच्या प्रश्नांची, आव्हानांची गोष्ट ही वेबसिरीज रंजक पद्धतीने सांगते.

दोन वर्षांपूर्वी या सिरीजचं पहिलं पर्व प्रदर्शित करण्यात आलं होतं. त्यात दिनार (आलोक राजवाडे), श्रेयस (अभय महाजन) आणि प्रसन्न (ललित प्रभाकर) यांच्या मैत्रीची, त्यांच्या वैयक्तिक नातेसंबंधांची गोष्ट सांगण्यात आली होती. कोणत्याही गँगप्रमाणे हे तिघे तोच नेहमी कँसल होणारा गोवा ट्रिपचा बेत आखतात आणि नैसर्गिक पद्धतीने आत्मशोध घेण्यासाठी मदत करणाऱ्या शांतिवन नावाच्या जागी पोहोचतात. तिथे त्यांचे प्रश्न उलगडतात आणि त्यांची आयुष्य पुन्हा एका नवीन वळणावर उभी राहतात. त्याच आव्हानांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न दुसऱ्या पर्वात करण्यात आला आहे. शांतिवनातून बाहेर पडल्यानंतर 18 महिने एकमेकांच्या संपर्कात नसणारे हे तिघे एक दिवस श्रेयसच्या कंपनीच्या पार्टीत भेटतात आणि अचानक दारूच्या नशेत दुसऱ्या दिवशी चक्क पाच राज्यांचा प्रवास करणाऱ्या एका आध्यात्मिक टूरला निघतात. या तिघांच्याही आयुष्यात त्यांच्या त्यांच्या वंचना आहेत. त्यांची ओझी मनावर वागवत ते तिघेही मनात नसताना हा प्रवास सुरू करतात. त्यात त्यांना त्यांच्या सहप्रवाश्यांची साथ लाभते. पुणे ते पशुपतीनाथ, नेपाळ अशा भल्यामोठ्या प्रवासात एकच धमाल उडते. बॅचलर पार्टीसाठी निमित्त शोधता शोधता अचानक देवस्थानं फिरायला लागल्याने त्यांच्यात नाखुशी असते. पण, आधी शांतिवनात आणि नंतर या आध्यात्मिक प्रवासात त्यांना आपला आत्मशोध कसा लागत जातो, त्याची गमतीदार कहाणी या सिरीजच्या दुसऱ्या पर्वात पाहायला मिळते.

सिरीजच्या पटकथेत बऱ्याच उणिवा आहेत. अनेक छोट्या छोट्या तार्किक गोष्टींचे दुवे कच्चे राहिले आहेत. तरीही हा प्रवास रंगतदार झाला आहे. त्याचं कारण त्यातले आजच्या तरुणाईचे संवाद आणि तितकेच अगम्य, अशक्य प्रसंग आहेत. विशेषतः चौथ्या आणि पाचव्या भागात घडणाऱ्या अनेक घटना मेंदूला पटत नसल्या तरी प्रेक्षक त्यात गुंतून राहतो. या सगळ्याचं श्रेय सारंग साठ्ये आणि पॉला मॅकग्लेन या दिग्दर्शक द्वयीला द्यावं लागेल. या पर्वाचं सगळ्यात मोठं बलस्थान त्याची सिनेमॅटोग्राफी आहे. विशेषतः परराज्यांची खासियत असणारे बारकावे नेमकेपणाने टिपण्यात आले आहेत. मध्य प्रदेशमधले शेतीचे पट्टे, उत्तर प्रदेशमधली धर्मशाळा, गंगेचे घाट, देखण्या वास्तुशैलींमधून जाणारे गल्लीबोळ, त्याहून उत्तरेला असलेले पहाडी प्रदेश, हिरव्यातून निळ्याकडे आणि निळ्यातून करड्या रंगाकडे जाणारी निसर्गाची रुपं या व्यक्तिरेखांचा प्रवास कॅमेऱ्याच्या भाषेत अचूक सांगतात. निखिल अरोळकर या सिनेमॅटोग्राफरला त्यासाठी पैकीच्या पैकी गुण द्यावे लागतील. तीच बाब अभिनयाची. पहिल्या पर्वाच्या तुलनेने या पर्वात अभय, आलोक आणि ललित यांनी या पर्वात जास्त धमाल उडवून दिली आहे. बेफिकीर वाटणारा, आईच्या ढवळाढवळीला कंटाळलेला श्रेयस, अभय महाजनने उत्तम साकारला आहे. आधीच्या पर्वातला दारूबाज, स्त्रीलंपट ते आताचा शांत, संयमी, विचारी दिनार अशी अभिनयाचा मोठा टप्पा आलोक राजवाडे याने सहजरित्या साकारला आहे. तर ललित प्रभाकर याने स्वप्नं भंगलेला, परिस्थितीशी जुळवून घेताना तारांबळ उडालेला आणि त्यात अस्तित्व हरवून बसलेला प्रसन्न उत्तम रंगवला आहे. प्रियदर्शनी इंदलकर हिने साकारलेलं समृद्धी हे पात्रंही लोभसवाणं झालं आहे. या चौघांच्या अभिनयाला सहप्रवाश्यांच्या अतरंगी, कलंदर व्यक्तिरेखांची साथ मिळाल्याने रंगत आणखी वाढली आहे. फक्त, पाचच भागांपेक्षा एखाद दुसरा अधिक भाग चालला असता असं राहून राहून वाटत राहतं.

थोडक्यात, सध्याच्या मारधाड धाटणीच्या आणि बीभत्स आशय असल्याचा आरोप होणाऱ्या ओटीटी माध्यमावर काही संथ, वरवर गंमतीदार वाटणाऱ्या पण, अंतर्मुख करणाऱ्या वेबसिरीजचे प्रयोग होताना दिसत आहेत. त्यात शांतीत क्रांती या वेबसिरीजचाही आवर्जून उल्लेख करावा लागेल.