Lok Sabha Election 2024 : वाढती महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून तरुण आक्रमक; ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन फोडले

लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 26 एप्रिल रोजी नांदेडसह इतर जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यामध्ये असणाऱ्या रामतीर्थ येथे एक तरुणाने ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन फोडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे काही काळ मतदान प्रक्रिया थांबली होती.

Lok Sabha Election 2024 : EVM बनवणारी कंपनी करतेय बक्कळ कमाई! 5 वर्षांत गुंतवणूकदारांना 700 टक्के परतावा

सदर तरुणाचे नाव भैय्यासाहेब एडके असे आहे. वाढती बेरोजगारी व इतर समस्यांमुळे संतप्त असल्यामुळे शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी त्याने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. नांदेड जिल्ह्यातील रामतीर्थ (ता. बिलोली) येथे मतदान प्रक्रिया सुरळीत चालू होती. मात्र दुपारच्या सुमारास बुथ नंबर 103 वर भैय्यासाहेब मतदान करण्यासाठी आले. ईव्हीएम ठेवलेल्या कक्षात गेल्यानंतर भैय्यासाहेब यांनी अचानक लोखंडी रॉड काढून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनवर घाव घातला. त्यामुळे मशीनचे चांगलेच नुकसान झाले. अचानक झालेल्या घटनेमुळे काही वेळ मतदान थांबलं होतं. मात्र तत्काळ पर्यायी व्यवस्था करून मतदान सुरळीत करण्यात आल्याची माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप यांनी दिली. घटना घडल्यानंतर सदर युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच वाढती बेरोजगारी व इतर प्रश्नांवरून शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी आपण हे कृत्य केल्याची कबुली भैय्यासाहेब एडके याने पोलिसांना दिली.

“नांदेड लोकसभा मतदार संघात रामतीर्थ पोलीस स्टेशन आहे. ते देगलुर विधानसभा अंतर्गत येते. या ठिकाणी एका व्यक्तिने ईव्हिएम आणि व्हीव्हीपॅट मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅटच्या चिप्स या सुरक्षित आहेत. त्या ठिकाणी तातडीने मशीन बदलून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी संबंधित व्यक्तिला ताब्यात घेतले आहे,” अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.