Video – उत्तराखंडला निघालेल्या बसवर दगडांनी भरलेला डंपर उलटला; 11 भाविकांचा मृत्यू, 25 जखमी

उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूर येथे भीषण अपघात झाला आहे. शनिवारी रात्री दगडांनी भरलेला डंपर धाब्यावर उभ्या बसवर उलटल्याने 11 भाविकांचा मृत्यू झाला, तर 25 जखमी झाले. जखमींंना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले हे सर्व भाविक उत्तराखंडला देवदर्शनासाठी निघाले होते. मात्र अर्ध्यातच त्यांच्यावर काळाने घाला घातला. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बसमधून जवळपास 70 प्रवासी प्रवास करत होते. सीतापूरहून उत्तराखंडच्या पूर्णगिरीकडे निघालेली ही बस रात्रीच्या जेवणासाठी एका धाब्यावर थांबली होती. त्याचवेळी भरधाव वेगात आलेला एक डंपर बसवर उलटला. त्यामुळे बसमधील प्रवासी डंपरखाली अडकले. यात 11 जणांचा मृत्यू झाला.

अपघात झाल्याचे कळताच धाब्यावरील कर्मचारी आणि बसमधून उतरलेल्या प्रवाशांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. पोलिसांनीही घटनास्थळ गाठल्याने बचावकार्याला वेग आला. जवळपास तीन तास हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. डपर बसवर उलटल्याने बसमधील प्रवाशांचा चेंदामेंदा झाला होता. पोलिसांनी आणि प्रशासनाने बसमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढत शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तसेच दोन्ही अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.

सदर घटनेची माहिती देताना एसपी अशोक कुमार मिणा यांनी सांगितले की, खुटार पोलीस स्थानकांदर्गत येणाऱ्या गोला बायपास रोडवर रात्री 11च्या सुमारास हा अपघात झाला. ही बस धाब्यावर जेवणासाठी थांबली होती. बसमधील काही प्रवासी खाली उतरून जेवण करत होते, तर काही प्रवासी आत आराम करत होते. याचवेळी दगडांनी भरलेला अनियंत्रित डंपर बसवर उलटला. पोलीस पुढील तपास करत आहे.