सिक्कीमच्या महापुरात 14 जणांचा मृत्यू; 23 जवानांसह 102 जण बेपत्ता

नेपाळमध्ये आलेल्या भूकंपामुळे सिक्कीमच्या उत्तरेस असलेले ल्होनक  सरोवर फुटले. त्याचवेळेला ढगफुटी झाल्यामुळे तीस्ता नदीही प्रचंड भरली आणि संपूर्ण सिक्कीम पाण्याखाली गेल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. दरम्यान, सिक्कीममध्ये ढगफुटी होऊन झालेल्या अतिवृष्टीमुळे आतापर्यंत तब्बल 14 जणांचा मृत्यू झाला आहे तर 23 जवानांसह 102 जण बेपत्ता आहेत. बेपत्ता जवानांचा मृत्यू झाल्याची शक्यता पाक्योंगचे महानगरदंडाधिकारी ताशी चोपेल यांनी व्यक्त केली आहे. ढगफुटीमुळे नदीच्या पाण्याची पातळी 15 ते 20 फुटांपर्यंत वाढली. त्यामुळे आलेल्या पुरात लष्कराच्या छावणीसह तब्बल 41 गाडय़ा वाहून गेल्या. पुरामुळे चुंगथांग नदीचा बांधदेखील तुटला. याच नदीवर सिक्कीमचा सर्वात मोठा हायड्रोपॉवर प्रकल्पही होता. परंतु, पुरामुळे ऊर्जा प्रकल्प संपूर्ण उद्ध्वस्त झाला. 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय संशोधनांत सिक्कीमच्या दक्षिणेकडील ल्होनक नदीचे पात्र केव्हाही फुटू शकते, असा इशारा देण्यात आला होता.