अल्पवयीन मुलीवर आठ वर्षांपासून अत्याचार; मामे भावासह मावस भावाला अटक

नगरमधील राहुरी तालुक्यात भावा बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. गेल्या आठ वर्षांपासून अल्पवयीन मुलीवर तिच्या सख्खा मामे भाऊ व मावस भाऊ दोघांनी मिळून लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. यादरम्यान त्या नराधमांनी पीडितेचे व्हिडिओ देखील काढले. घडल्या प्रकाराबाबत कोणाला सांगू नये, जर कोणाला काही सांगितले तर व्हिडिओ व्हायरल करू असे पीडितेने सांगितले. शारीरिक व मानसिक त्रास देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल राहुरी पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मामेभाऊ ऋषिकेश पांडुरंग धोंडे (वय 25) व मावस भाऊ सतीश टकले अशी या आरोपींची नावे आहेत. पीडित अल्पवयीन मुलीच्या घरी तिचे हे दोन भाऊ दिवाळीच्या सुट्टीत व उन्हाळ्याच्या सुट्टीत यायचे. यादरम्यान दोघांनीही सातल्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. तसेच अत्याचारादरम्यान तिचे मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग केले. पीडिता या सगळ्या जाचाला कंटाळली होती. या नराधमाच्या तावडीतून सुटण्यासाठी तिने प्रयत्न केले. मात्र याबाबत तिने कोणालाही सांगू नये, यासाठी तिला धमकावण्यात आले होते. एवढेच नाही तर गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून मामेभावाने आळंदी येथे तिच्यासोबत लग्न केले. त्यानंतर शारीरिक व मानसिक त्रास देऊन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हे सगळं गेली आठ वर्षे पीडिता सहन करत होती. शेवटी तिने पोलिसांकडे तक्रार नोंदवली आणि घडलेला सगळा प्रकार सांगितला. पीडीत मुलीच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 376,376(2) (n)376(D)366,354,307,324,323,504,506,34, सह पोक्सो अधि. कलम 8, 11, 12 प्रमाणे अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

सदर गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे हे करत होते. यावेळी त्यांच्या गुप्तहेराने दिलेल्या माहितीवरुन बीड जिल्ह्यातून ऋषिकेश पांडुरंग धोंडे याला शिताफिने ताब्यात घेण्यात आले. त्यास अटक करून राहुरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर डाँ. बसवराज शिवपूजे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय आर ठेंगे यांच्या पोलिस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, साहय्यक फौजदार भराटे, पो.हे.का. सुरज गायकवाड, पो.हे.कॉ. पालवे, पो.कॉ प्रमोद ढाकणे, पो.कॉ सचिन ताजने, पो.कॉ.नदीम शेख,पो.कॉ. इफ्तेखार सय्यद, पो.कॉ. अंकुश भोसले, पो.कॉ.सतीश कुऱ्हाडे, पो.कॉ. गोवर्धन कदम, गोपनीय अशोक शिंदे, श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे सिचिन धानंद यांनी केली आहे.