IPL 2024 – संघमालकाने केएल राहुलला ऑन कॅमेरा झापले; चाहत्यांनी केली तत्काळ टीम सोडण्याची मागणी

बुधवारी सनरायझर्स हैदराबाद संघाने लखनऊ सुपर जायंट्सचा दारुण पराभव केला. लखनऊने विजयासाठी दिलेले 166 धावांचे आव्हान हैदराबादने अवघ्या 9.4 षटकांमध्ये पूर्ण केले. ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या जोडीने नाबाद भागिदारी करत संघाला बलाढ्य विजय मिळवून दिला. लखनऊचा हा लाजिरवाणा पराभव संघमालकाच्याही जिव्हारी लागला आहे. या पराभवानंतर केएल राहुल आणि संघमालक संजीव गोएंगा यांच्यात तूतू-मेंमेंही झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हैदराबादचा सलामीवीर ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी चौफेर फटकेबाजी केली. दोघांनी पॉवर प्लेमध्येच संघाला शंभरी गाठून दिली. त्यानंतरही दोघांनी चौकार-षटकारांची आतषबाजी सुरुच ठेवली आणि संघला 62 चेंडू राखून विजय मिळवून दिला. हेडने अवघ्या 30 चेंडूत 8 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने नाबाद 89, तर अभिषेक शर्माने 28 चेंडूत 8 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने नाबाद 75 धावा चोपल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)

दारुण पराभवानंतर केएल राहुल निराश झाला. लखनऊ सुपर जायंट्सचे संघमालक संजीव गोएंका हे देखील संतापल्याचे दिसले. गोएंका यांनी ऑन कॅमेरा राहुलला झापले. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर फॅन्सने संताप व्यक्त केला असून राहुलने आत्मसन्मानासाठी तत्काळ लखनऊची टीम सोडून द्यावी अशी मागणी केली.