मतदानात कोल्हापूर जिल्हा ठरला अव्वल; कोल्हापूर आणि हातकणंगलेत सरासरी 71 टक्के मतदान

कोल्हापूर मतदारसंघात काल एकूण 71.59 टक्के, तर हातकणंगले मतदारसंघात 71.11 टक्के मतदान झाले. मंगळवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने अनुक्रमे अंदाजित सरासरी 70 आणि 68 टक्के मतदान झाल्याचे जाहीर केले होते. आज सायंकाळी जिल्हा प्रशासनाने अंतिम आकडेवारी जाहीर केली.

यानुसार ‘कोल्हापूर’मधून करवीर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 79.61 मतदान झाले. मागील वर्षी येथून 75.42 टक्के झाले होते, तर हातकणंगलेमधून सर्वाधिक हातकणंगले विधानसभा मतदारसंघात 75.32 टक्के झाले. मागील निवडणुकीत येथून 75.94 टक्के मतदान झाले होते, तर 2019च्या निवडणुकीत कोल्हापूर 70.70 टक्के, तर हातकणंगले मतदारसंघात 70.28 टक्के मतदान झाले होते. अंतिम मतदान टक्केवारीवरून जिथे राजकीय चुरस अधिक तेथे मतदानाचा टक्का वाढल्याचे समोर आले. मागील वेळेप्रमाणेच राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर, तर दुसऱया क्रमांकाचे मतदान हातकणंगलेमध्ये झाल्याचे दिसून येते.

कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघांत चुरशीने लढत झाली. कोल्हापूरमध्ये 23 आणि हातकणंगलेमध्ये 27 उमेदवार रिंगणात होते. मात्र, खरी लढत महाविकास आघाडीचे उमेदवार श्री शाहू महाराज छत्रपती आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यात होती. तर, हातकणंगलेमध्ये महाविकासचे सत्यजित पाटील-सरुडकर, महायुतीचे धैर्यशील माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि वंचित आघाडीचे डी. सी. पाटील यांच्यात चौरंगी लढत होती.

दोन्ही मतदारसंघांत एकूण 37 लाख 50 हजार 680 मतदार आहेत. त्यापैकी कोल्हापूरमध्ये 19 लाख 36 हजार 430 पैकी 13 लाख 86 हजार 230 मतदारांनी हक्क बजावला. तर, हातकणंगलेमध्ये एकूण 18 लाख 14 हजार 277 मतदार आहेत. यापैकी 12 लाख 90 हजार 73 मतदारांनी मतदान केले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सर्वात अधिक मतदान करवीर, त्यापाठोपाठ कागल, कोल्हापूर दक्षिण, राधानगरी, चंदगड आणि उत्तर कोल्हापूर असे मतदान झाले. हातकणंगलेमध्ये सर्वाधिक हातकणंगले, त्यापाठोपाठ शिरोळ, शाहूवाडी, ईश्वरपूर, इचलकरंजी आणि शेवट शिराळा अशी मतदानाची टक्केवारी दिसून आली.