कराडजवळ पोलिसांच्या गाडीला अपघात; 15 जखमी

निवडणुकीचा बंदोबस्त आटोपून पाटण येथून निघालेल्या पोलिसांच्या खासगी आराम बसला झालेल्या अपघातात 15 कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यातील तिघेजण गंभीर आहेत. कराड-पाटण रस्त्यावरील गोटे गावच्या हद्दीत सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात झाला. संबंधित कर्मचारी तुर्ची येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील कर्मचारी आहेत.

संदीप पवार, लक्ष्मण सुतार व अजित नलवडे या गंभीर जखमी झालेल्या पोलिसांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अन्य जवळपास 15 पोलीस किरकोळ जखमी आहेत. समोरून येणाऱया ट्रकने हुलकावणी दिल्याने पोलिसांची खासगी आराम बस रस्त्याकडेच्या पडक्या घराला जाऊन धडकली, अशी पोलिसांची प्राथमिक माहिती आहे.

लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी तुर्ची येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील कर्मचारी पाटण येथे बंदोबस्तासाठी आले होते. बंदोबस्त आटोपून ते पुन्हा परत निघाले होते. कराडनजीकच्या गोटे येथे समोरून आलेल्या भरधाव आयशर ट्रकने हुलकावणी दिल्याने पोलिसांच्या बसच्या चालकाचा ताबा सुटून बस रस्त्याकडेच्या पडक्या घराला धडकली. त्यात जवळपास 15 कर्मचारी जखमी झाले. यामध्ये तिघे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती समजताच, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. अधीक्षक समीर शेख यांनी जखमींची विचारपूस केली. दरम्यान, आराम बसचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.