पॅलेस्टाईनचे समर्थन केल्याने मुंबईत मुख्याध्यापिकेला कामावरून काढले

पॅलेस्टाईन समर्थनार्थ पोस्टवर मत प्रदर्शन केल्याने सोमय्या विद्याविहार शाळेच्या मुख्याध्यापिका परवीन शेख यांना मुख्याध्यापक पदावरून काढून टाकण्यात आले. ही कारवाई बेकायदेशीर आणि अन्यायकारक असल्याचा आरोप शेख यांनी केला आहे. तसेच ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने करण्यात आली असून याविरोधात कायदेशीर लढाई लढण्याचा इशारा शेख यांनी दिला आहे. मागील 12 वर्षांपासून परवीन शेख या सोमय्यामध्ये कार्यरत आहेत. सात वर्षांपूर्वी त्यांनी मुख्याध्यापक म्हणून काम सुरू केले. संस्थेने केलेल्या कारवाईविरोधात बोलताना त्यांनी सांगितले, आतापर्यंतच्या कार्यकाळात शाळेच्या वाढीसाठी आणि प्रगतीसाठी कठोर परिश्रम, समर्पण आणि प्रामाणिक योगदान दिले आहे. त्यामुळे संस्थेने माझ्या मागे उभे राहणे गरजेचे होते. मात्र माझ्याविरोधात राजकीय सूडबुद्धीने अपमानकारक कारवाई करण्यात आली. शेख यांचे लेखी म्हणणे ऐकून घेतल्यानंतरही त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. आमची संस्था ही 80 वर्षांहून अधिक वर्षांपासून शिक्षणाचा वारसा चालवते. संस्थेचे काही मूल्ये आणि वचनबद्धतता ठरली असून त्याला शेख यांनी सोशल मीडियावर केलेल्या प्रतिसादामुळे तडा गेल्याने आम्हाला त्यांच्यावर ही कारवाई करावी लागल्याचे संस्थेने म्हटले आहे.

कायदेशीर लढाई लढणार

संस्थांकडून सेवा समाप्तीची नोटीस मिळण्यापूर्वीच सोशल मीडियावरून मला शाळेतून काढून टाकल्याची बातमी मिळाली. हे ऐकून मला धक्काच बसला. ही नोटीस बेकायदेशीर आहे. ही कृती राजकीय हेतूने प्रेरित आहे. माझा आपल्या कायदेशीर व्यवस्थेवर आणि देशाच्या संविधानावर ठाम विश्वास आहे. सध्या मी कायदेशीर पर्यायांचा विचार करत करतेय, असे शेख म्हणाल्या.