अखेर ते चार गाळे प्राथमिक शिक्षक बँकेच्या ताब्यात; बँकेने 20 वर्षांनी न्यायालयीन लढाई जिंकली

सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची अर्थवाहिनी असलेल्या प्राथमिक शिक्षक बँकेच्या मालकीच्या इमारतीतील 4 गाळ्यांसंदर्भात गेली वीस वर्षे सुरू असलेला न्यायालयीन लढा बँकेने जिंकला असून, चारही गाळे बँकेच्या ताब्यात आले आहेत. आता बँकेच्या सातारा शाखेचे कामकाज लवकरच या ठिकाणी सुरू होणार आहे. बँकेचे चेअरमन किरण यादव, व्हाईस चेअरमन शहाजी खाडे यांनी ही माहिती दिली.

सातारा येथील पोवई नाका परिसरात शिक्षक बँकेची स्वमालकीची इमारत असून, त्यामध्ये बँकेचे मुख्य कार्यालय व सातारा शाखा कार्यालय कार्यरत आहे. इमारतीच्या दर्शनी भागातील 4 गाळे 5 फेब्रुवारी 1974 रोजी भाडेकराराने दिलेले होते. दरम्यान, बँकिंग व्यवहार करण्यासाठी सभासद व खातेदार यांना इमारतीमधील वरच्या मजल्यावर यावे लागत असल्याने या त्रासातून मुक्तता होण्यासाठी बँकेने संबंधित गाळेधारकांना नोटिसा बजावून 1 एप्रिल 2004 रोजीपर्यंत गाळ्यांचा कब्जा मागितला होता. मात्र, त्यास संबंधितांकडून प्रतिसाद न मिळाल्याने बँकेने 27 एप्रिल 2004 रोजी सातारा येथील दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. या दाव्याचा निकाल दि. 5 डिसेंबर 2018 रोजी बँकेच्या बाजूने झाला. मात्र, या निकालाविरुद्ध गाळेधारकांनी अपील दाखल केले. ते अपील न्यायालयाने 8 एप्रिल 2022 रोजी डिसमिस केले.

त्यानंतर गाळेधारकांनी उच्च न्यायालयात अपील केले. या खटल्याचे कामकाज वेळोवेळी सुरू होते. बँकेचे वकील बँकेची बाजू भक्कमपणे मांडत होते. त्यामुळे सर्व कागदपत्र व दाखल पुराव्यांवरून उच्च न्यायालयाने बँकेच्या बाजूने निकाल देऊन गाळेधारकांना गाळे बँकेच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे सर्व गाळे बँकेच्या ताब्यात मिळाले आहेत.

संचालक मंडळाने सातत्यपूर्ण पाठपुरावा करून सुमारे 20 वर्षे चाललेला न्यायालयीन लढा जिंकल्याबद्दल सभासदांनी बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाचे अभिनंदन केले आहे. अल्प कालावधीत बँकेच्या सातारा शाखा कार्यालयाचे कामकाज या गाळ्यात सुरू करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असून, त्यादृष्टीने प्रत्यक्ष कामकाजास सुरुवातदेखील झाली असल्याचे बँकेचे चेअरमन किरण यादव, व्हाईस चेअरमन शहाजी खाडे यांनी सांगितले.