एअर इंडिया एक्स्प्रेसच्या कर्मचाऱ्यांना सामूहीक दांडी मारणं पडलं भारी, 25 कर्मचाऱ्यांचे केले निलंबन

विमान कर्मचाऱ्यांनी आजारपणाचे कारण देत सामूहिक दांडी मारल्यामुळे ऐनवेळी एअर इंडियाची अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली होती. आता विमान कंपनीने त्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. कंपनीने या सर्व कर्मचाऱ्यांना टर्मिनेशन लेटर दिले आहे. कर्मचाऱ्यांपैकी एकाला पाठवण्यात आलेल्या टर्मिनेशन लेटरनुसार एअरलाइन्सने  एकाच वेळी एवढे कर्मचारी आजारी पडणे म्हणजे जाणीवपूर्वक घेतलेली सामूहीक दांडी असल्याचे अधोरेखित करत ही कारवाई केली.

सोशल मीडियावर व्हायरल होणारे टर्मिनेशन लेटरवर स्पष्ट लिहीले आहे की, कामाच्या बरोबर काही वेळेआधी आजारी पडणं याचा अर्थ क्रू मेंबर्स जाणिवपूर्वक फ्लाईट ऑपरेशनमध्ये बाधा आणली. जे कायदा आणि नियमांच्या विरोधात आहे. याशिवाय, क्रू मेंबर्सनी एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड कर्मचारी सेवा नियमांचेही उल्लंघन केले आहे. एअर इंडिया एक्स्प्रेसचे सीईओ आलोक सिंग यांच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी रात्रीपासून 100 हून अधिक केबिन क्रू सदस्य त्यांच्या नियोजित फ्लाइट ड्युटीच्या आधी आजारी असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे 90 हून अधिक उड्डाणे रद्द करावी लागली आणि प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.

टाटा समूहाच्या एअर इंडियाच्या एअर इंडिया एक्स्प्रेस आणि एआयएक्स या दोन सहाय्यक कंपन्या आहेत. कमी किमतीची विमानसेवा तयार करण्यासाठी दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरणही सुरू आहे.या प्रकरणी मिळालेल्या सुत्रांच्या माहितीनुसार,
एअर इंडिया एक्स्प्रेसच्या केबिन क्रू मेंबर्सचा आरोप आहे की एआयएक्स कनेक्टच्या क्रू मेंबर्सच्या तुलनेत त्यांच्याशी अत्यंत असमान वागणूक दिली जात आहे. ज्याची तक्रार त्यांनी टाटा समूहाचे चेअरमन एन चंद्रशेखर यांना एक पत्र लिहून केली होती.