जगभरातून थोडक्यात आणि सुटसुटीत बातम्या.

पाच वर्षांच्या चिमुरडय़ामुळे दारूचे दुकान बंद

कानपूर येथे एका पाच वर्षांच्या मुलामुळे दारूच्या दुकानाचे शटर डाऊन होणार आहे. आझाद नगर येथील सेठ एमआर जयपुरिया शाळेमध्ये पाच वर्षांचा अथर्व शिकतो. केजीमध्ये शिकणाऱया अथर्वच्या वतीने दारू दुकानाविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्याच्या शाळेजवळ फक्त 20 फुटांच्या अंतरावर हे दुकान आहे. दुकानात येणाऱया दारुडय़ांमुळे त्रास होत असल्याचे याचिकेतून निदर्शनास आणून दिले होते. यावर सुनावणी देताना दारू दुकानाचा परवाना नूतनीकरण करण्यास प्रयागराज हायकोर्टाने स्थगिती दिली. या दुकानाचा परवाना दरवर्षी कसा काय वाढवून मिळतो? परवाना संपल्यानंतर त्याचे नूतनीकरण करणे जरुरी नाही. दुकानाचा सध्याचा परवाना 31 मार्च 2025 पर्यंत आहे. तो वाढवून देऊ नये, असे न्यायालयाने म्हटले.

इन्स्टावर ‘बाबू’चा धुमाकूळ!

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर सध्या ‘बाबू’ या शब्दाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. इन्स्टावर यूजर्स वेगवेगळय़ा रील बनवत असतात; परंतु सध्या ‘बाबू… ’ची रील इन्स्टाग्रामवर जोरात सुरू आहे. या रीलला यूजर्सचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ‘तुम मुझे छोड के मत जाना, मैं तुम्हारे बिना रह नही पाउँगा… बाबू….’ असा हा व्हिडीओ आहे; परंतु या व्हिडीओने संपूर्ण इन्स्टा जॅम केले आहे. या व्हिडीओला मुलींनी जितके पसंत केले आहे तितकेच मुले आणि महिलासुद्धा पसंत करत आहेत. इन्स्टाग्रामवरील  simplestar24000  या यूजर आयडीचा हा ओरिजनल व्हिडीओ असून आतापर्यंत तब्बल 6.4 मिलियन लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तसेच लाखो यूजर्सनी हा व्हिडीओ शेअर करत आपापले रील व्हिडीओ बनवले आहेत. व्हिडीओ बनवल्यानंतर ‘टॅग यूअर बाबू…’ असे मजेदार पॅप्शनही दिले जात आहेत. ‘तुम घर से बाहर मत निकलना, बाहर बहोत धुप है…तुम काली हो जायोगी, बाबू….’ यांसारख्या वेगवेगळय़ा भन्नाट रील्सना लाखो यूजर्सची पसंती मिळत असून ‘बाबू’च्या रील्सला हजारो लाइक, कमेंट आणि शेअर्स मिळत आहेत.

दिल्लीत दुकानांची 33 टक्के भाडेवाढ

दिल्लीचे ‘दिल’ म्हणून ओळखल्या जाणाऱया कनॉट प्लेस भागात वर्षभरात 33 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे कनॉट प्लेसमध्ये दुकान किंवा ऑफिस भाडेतत्त्वावर घेणे महागले आहे. ‘टियर वन’च्या शहरांमधील ही सर्वाधिक वाढ आहे. कनॉट प्लेसनंतर बंगळुरूच्या हेनूर मेन रोड आणि कमर्शिअल स्ट्रीट आहे तिथे वर्षभरात अनुक्रमे 20 टक्के, 17 टक्के अशी भाडेवाढ झाली आहे, असे नाईट फ्रँक इंडियाच्या अहवालातून समोर आले आहे.

गुजरातच्या सौराष्ट्रात भूपंपाचे धक्के

गुजरातच्या सौराष्ट्रात बुधवारी दुपारी भूपंपाचे धक्के बसले. आज दुपारी 3 वाजून 18 मिनिटांनी सौराष्ट्रात तलालापासून 12 किमी उत्तर-उत्तर पूर्वमध्ये हे भूपंपाचे धक्के बसले. या भूपंपाची तीव्रता 3.4 रिश्टर स्केल  नोंदली गेली.

गौरव मोरेने ‘हास्यजत्रा’ सोडली  

कॉमेडी शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून अभिनेता गौरव मोरेने एक्झिट घेत असल्याची आज घोषणा केली. सोशल मीडियावर पोस्ट लिहीत गौरवने निर्णयाची माहिती दिली. गौरवने म्हटलेय, मला सांगताना खूप वाईट वाटत आहे की, मी आपल्या लाडक्या मालिकेतून म्हणजेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून आपला निरोप घेत आहे.   गौरवच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत.