दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करण्याची यांना सवयच आहे; नीलेश लंके यांचा विखे यांच्यावर हल्लाबोल

मतदारसंघात लक्ष्मीदर्शन सुरू झाले आहे. लक्ष्मीकडे पाठ करू नका. गरिबाघरचं लग्न नाही. तिकडून घ्या, राहिलं थोडं फार तर माझ्याकडेही पाठवा. मत मात्र तुतारीलाच द्या, असे सांगत पाच वर्षे खासदार असणाऱयांनी दुसऱयांनी केलेल्या कामांची उद्घाटने केली. कारण त्यांना दुसऱयाच्या झेंडय़ावर पंढरपूर करण्याची सवय आहे, असा हल्लाबोल नीलेश लंके यांनी विखे-पाटील यांचे नाव न घेता केला.

राहुरी येथील प्रचारसभेत नीलेश लंके बोलत होते. या वेळी आमदार प्राजक्त तनपुरे, बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, हर्ष तनपुरे, नितेश कराळे, शहराध्यक्ष संतोष आघाव, सूर्यकांत भुजाडी, शिवसेनेचे सचिन म्हसे, बाळासाहेब आढाव आदी उपस्थित होते.

नीलेश लंके म्हणाले, ‘ज्यांना पाच वर्षांपूर्वी आपण संसदेत पाठविले त्यांनी काय दिवे लावले? शेतकऱयाचा, समाजहिताचा एकही प्रश्न त्यांनी संसदेत मांडला नाही. मतदारसंघातील विकासकामेही केली नाहीत. दुसऱयाच्या झेंडय़ावर पंढरपूर करण्याची त्यांना सवय आहे. दुसऱयाने मंजूर केलेल्या कामाचे भूमिपूजन करण्याचे उद्योग ते करत असल्याचा आरोप लंके यांनी केला. निवडणुकीला सामोरे जाताना त्यांनी विकासाच्या मुद्यावर बोलले पाहिजे. मात्र, भाजपच्या निक्रिय खासदारांच्या यादीत त्यांचे नाव आहे, अशी टीका नीलेश लंके यांनी केली.

मोदींनी फक्त किडण्याच विकायच्या ठेवल्या आहेत – कराळे
पंतप्रधान मोदींनी बंदा देश विकायला काढला असून, आता त्यांनी तुमच्या किडण्याच विकायच्या ठेवल्या आहेत. ते थापा मारण्यापलीकडे काहीही करीत नसल्याचे नीतेश कराळे यांनी सांगितले. 2014 मध्ये त्यांनी महागाईच्या विषयावर मते मागून सत्ता मिळविली. दहा वर्षांनंतर महागाईची काय स्थिती आहे. महागाई पाहता मोदी सरकार हद्दपार करण्याची वेळ आली आहे, असे कराळे यांनी सांगितले.

माजी खासदार सुजय विखे
– आमदार तनपुरे

आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले, ‘सुजय विखे-पाटील यांना विद्यमान नव्हे, तर माजी खासदार म्हटले तरी चालणार आहे. कारण मतदारसंघात तशी परिस्थिती दिसत आहे, तर नीलेश लंके यांना भावी खासदार म्हटले तरी वावगे ठरणार नाही, असेही तनपुरे यांनी सांगितले. आपला ग्रामीण भाग असून, या भागाच्या संवेदना, अडीअडचणी जाणून घेणारा माणूस संसदेमध्ये त्या मांडू शकतो. जो माणूस पाच वर्षांत आपल्याकडे आलाच नाही, तर त्याला त्यांचे दुःख कसे कळणार? ते संसदेत काय मांडणार,’ असा सवाल आमदार तनपुरे यांनी केला.