चंद्रकांत पाटलांमुळेच बारामतीत मतदानाचा टक्का घसरला

बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरल्याने महायुतीचे नेते चिंतेत आहेत. हा मतदानाचा टक्का घसरण्यामागे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हेच कारणीभूत असल्याचा आरोप महायुतीच्या बैठकीत करण्यात आला. महायुतीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील नाराजी व्यक्त केली आहे.

‘बारामतीत शरद पवार यांचा आम्हाला पराभव करायचा आहे,’ असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. पाटील यांची ही भाषा आणि टीका ‘बघून घेण्या’ची असल्याने त्याबद्दल कोथरूडमध्ये काल झालेल्या महायुतीच्या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली.

गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघात 61.70 टक्के मतदान झाले होते. यावेळी मतदानाचा टक्का घटला आहे. त्याची काही कारणे पुढे आली आहेत. त्यामध्ये महायुतीच्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य हेदेखील कारणीभूत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील अप्रत्यक्षपणे ही नाराजी बोलून दाखविली.