मोदींचे मानसिक संतुलन बिघडलेले, त्यांची गाडी रुळावरून घसरलीय; संजय राऊत यांचा घणाघात

देशाचे पंतप्रधान लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बेताल वक्तव्य करत आहेत. त्यांची प्रकृती बरी नाही. हे चांगल्या मानसिकतेचे लक्षण नाही. त्यांची गाडी रुळावरून घसरली असून भाजपने त्यांना तत्काळ प्रचारातून बाजूला करायला हवे, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. निलेश लंके यांच्या प्रचारार्थ अहिल्यानगर येथे आले असता घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शिवसेना उपनेते साजन पाचपुते, सांगलीचे लोकसभेचे उमेदवार चंद्रहार पाटील उपस्थित होते.

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा ठेवलेली नाही. 10 वर्षापासून ते पंतप्रधानपदावर असून तिसऱ्यांदा सार्वत्रिक निवडणुकीस सामोरे जात आहेत. त्यांनी देशाचे भवितव्य, विकास, लोककल्याण याविषयी भूमिका मांडायला हव्यात. तिसऱ्यांदा का निवडून द्यावे, 10 वर्षात काय कामं केली हे सांगायला हवे. पण आतापर्यंत एकाही प्रचारसभेत त्यांनी अशा प्रकारची भूमिका मांडलेली नाही. त्यांची गाडी पूर्णपणे रुळावरून घसरलेली आहे. पंतप्रधानपदावरील व्यक्ती प्रचारात काहीही बरळू लागतो याचा अर्थ त्यांची प्रकृती बरी नाही. त्यांच्या बोलण्यातून हे जाणवत आहे. हे चांगल्या मानसिकतेचे लक्षण नाही, असा टोला खासदार राऊत यांनी लगावला.

काल पंतप्रधानांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल विधान केले. उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार नाहीत असे ते महाराष्ट्राबाहेरच्या सभेत म्हणाले. हे त्यांच्या बिघडलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे, असेही राऊत म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, तेलंगणातील सभेत बोलताना मोदींनी काँग्रेस पक्ष अदानी-अंबानींच्या काळ्या पैशावर निवडणुका लढतोय असे विधान केले. राहुल गांधी यांना टेम्पो भरून काळा पैसा मिळतोय असे ते म्हणाले. ते आर्थिक आश्रयदात्यांवर हल्ला करू लागलेत, याचा अर्थ ते पराभूत झाले आहेत. अदानी-अंबानींवर मोदी काल प्रथमच बोलले. गंभीर गोष्ट म्हणजे ते देशाचे पंतप्रधान असून देशातील काळा पैसा आणि भ्रष्टाचाराचा पैसा नष्ट करेन असे वचन त्यांनी दिले होते. तेच मोदी आता अदानी-अंबानींचा काळा पैसा टेम्पो करून काँग्रेसकडे जातोय असे म्हणत आहेत. याचा अर्थ मोदींना या भ्रष्टाचाराच्या व्यवहाराची माहिती असून पीएमएलए कायद्यानुसार त्यांनी तत्काळ त्या उद्योगपतींवर कारवाई केली पाहिजे. केंद्र सरकार याच कायद्याखाली दुसऱ्यांना अटक करते. आता पंतप्रधान स्वत: जाहीरपणे असे विधान करत आहेत, याचा अर्थ हे मनी लॉण्डरिंग आहे. ईडीने मोदींचे स्टेटमेंट ग्राह्य धरून ज्यांच्यावर काळा पैसा दिल्याचा आरोप केला त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. जर मोदी कारवाई करणार नसतील तर त्यांचे मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडलेले आहे. भाजपने जबाबदारीने आपल्या नेत्यावर उपचार करावेत, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

दरम्यान, नाशिकचे शिवसेने जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस देण्यात आली आहे. यावर भाष्य करताना राऊत यांनी मिंधे सरकारवर आसूड ओढले. ऐन निवडणुकीमध्ये तडीपारीची नोटीस काढण्यात आली आहे. 4 जूनपर्यंत काय तांडव करायचा तो करा. सगळे गुंड सध्या तुरुंगातून सोडवून मुख्यमंत्र्यांच्या मुलाबरोबर, मुख्यमंत्र्यांबरोबर फिरत आहेत. स्वत: राज्याचे मुख्यमंत्री तडीपार होतील असे गुन्हे त्यांचे आहेत. मुख्यमंत्री आणि त्यांच्या टोळीचे एवढे अपराध आहेत की त्यांनाही तडीपारीची नोटीस बजावली जाईल किंवा तुरुंगात जातील. ज्या गुन्ह्यासाठी अटक होईल म्हणून यांची गाळण उडाली, पाय लटपटू लागले, डोळ्यातून अश्रू निघाले तीच ईडी आता त्यांच्या मागे लागेल आणि त्यांना तुरुंगात टाकेल. तेव्हा मोदी, शहा, फडणवीस वाचवायला येणार नाहीत, असा हल्लाबोलही राऊत यांनी केला.

देशामधील नरेंद्र मोदी यांनी ‘400 पार’चा नारा दिलेला आहे. देशाचे संविधान त्यांना बदलायचे आहे, त्यासाठीच ते अशा प्रकारचे विधानं करत आहेत, असेही राऊत म्हणाले. तसेच अमित शहा यांनी काल जे वक्तव्य केले त्याचाही समाचार राऊत यांनी घेतला. काँग्रेसच्या काळामध्येच राम मंदिराच्या गर्भगृहाचे कुलूप उघडले गेले. काँग्रेसच्या कार्यकाळातच या मंदिराच्या कुलूपावर हातोडा मारला गेला हे बहुदा शहांना माहिती नसावे, असेही राऊत म्हणाले.