गोदावरी नदीपात्राला आले वाळवंटाचे स्वरूप

गोदावरी खोऱ्यातील धरणांमधील पाणीसाठा खालावला असल्यामुळे धरण पाणलोट क्षेत्रातील कोपरगाव येथील बारमाही वाहणाऱ्या गोदावरी नदीचे पात्र कोरडे ठणठणीत पडले असून, त्याला वाळवंटाचे स्वरूप आले आहे. नदीला पाणी नसल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

प्रचंड वाळूउपसा, नदीपात्रात ठिकठिकाणी टाकण्यात आलेले बेसुमार विजेचे आकडे, नदीपात्रात खोदलेल्या विहिरी व त्यावर चालवणाऱया मोटारी व बेसुमार पाण्याचा उपसा यामुळे व निसर्गाचा बिघडलेला समतोल तसेच गतवर्षी कमी प्रमाणात झालेला पाऊस यामुळे दक्षिणगंगा गोदावरी नदीचे पात्र कोरडेठाक पडले आहे. त्यावरून दुष्काळाची दाहकता दिसून येत आहे. कोपरगाव तालुक्यातील संवत्सर गावाजवळील हे गोदावरीचे नदीपात्र असून, ते पूर्णतः कोरडे पडले आहे. यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, नदीपात्रात पाण्याचा एक थेंबही दिसत नाही.

गोदावरी पात्र कोपरगाव तालुक्याच्या परिसरातील भागासाठी वरदान ठरलेले आहे. यामुळे गोदावरी ही परिसरातील गावांची जगतजननी समजली जाते. शेतकरी, शेतमजूर, व्यावसायिक तसेच इतर क्षेत्रातील बहुतांशी नागरिक याच नदीवर अवलंबून आहेत. नदीला पाणी नसले की अनेक अडचणी येतात. पाणी, चारा, रोजगार याबाबतीत संघर्ष करावा लागतो.

दुष्काळ अन् वाळूउपशामुळे भीषण परिस्थिती

कोपरगाव तालुक्याच्या गोदावरी नदीच्या पट्टय़ातून परिसरातून बारा महिने वाहणाऱ्या गोदावरीचे पात्र यावर्षी मार्च महिन्यातच कोरडेठाक पडले गेले. दुष्काळामुळे यावर्षी जानेवारी महिन्यातच बोअर, विहिरी आटल्याने परिसरात दुष्काळाच्या तीव्र झळा जाणवत आहेत. त्यामुळे दक्षिणगंगा गोदावरी पात्राला वाळवंटाचे स्वरूप आले आहे. पूर्वी वाळूत पाणी साठून राहायचे; परंतु बेसुमार वाळूउपशामुळे आता गोदावरी नदीचे वाळवंट झाले आहे. जीवनदायी म्हणून ओळख असलेल्या गोदावरीमुळे परिसराला वैभव प्राप्त झाले होते. मात्र, मागील दहा-वीस वर्षांत नदीपात्रातून बेसुमार वाळूउपसा सुरू आहे. याचा परिणाम नदीपात्रातील पाण्यावर झाला आहे.

बंधाऱ्यांनी गाठला तळ
पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी झाल्याने गोदावरी पात्र कोरडे पडले आहे. समन्यायी पाणीवाटपाचा कोलदांडा शेतकऱयांच्या उरावर बसला आहे. यावर्षी नाशिकच्या धरणांमधून जायकवाडी धरणात मोठय़ा प्रमाणावर पाणी सोडण्यात आले होते. लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या बंधाऱ्यांनी तळ गाठला आहे. याचा परिणाम या भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यावर झाला आहे. सद्यस्थितीत नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. प्राणीही पाण्यासाठी भटकंती करताना दिसत आहेत.

ड्रेनेजचे पाणी नदीपात्रात
कोपरगाव शहरानजीक छोटय़ा पुलाजवळ साचलेल्या डबक्यातील पाण्यावर हिरवा तरंग आला असून, त्यामुळे जलचर प्राणी, मासे मरून पडल्याचे दिसून येते. शहरातील ड्रेनेजचे पाणी नदीपात्रात सोडले असल्याने हे पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याने जनावरे त्या पाण्याला तोंडही लावत नाहीत.

दशक्रिया विधीला अडचण
दक्षिणगंगा गोदावरीचे पात्र पवित्र मानले जात असल्याने जिल्ह्यातील बहुतांश गावांतील नागरिक मयत नातेवाईकांचा दशक्रिया विधी कोपरगाव, पुणतांबा परिसरात गोदावरी नदीपात्रामध्ये करतात. मात्र, गोदावरी कोरडी पडल्याने दशक्रिया विधी करण्यास अडचणी येत आहेत.