वन्य प्राण्यांना सुद्धा बसतोय उष्णतेचा फटका; अन्न आणि पाण्यासाठी करावी लगातीये वणवण

सध्या देशभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. नागरिकांना उन्हाळ्याचा फटका चांगलाच बसत आहे. त्याचबरोबर वन्य प्राण्यांना सुद्धा कडक उन्हाळ्याचा सामना करावा लागत आहे. वन्य प्राणी भर उन्हात पाणी व अन्नधान्याच्या शोधात भटकत असल्याचे चित्र पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.

पुणे जिल्ह्यातील कुदळवाडी परिसरातील घाट रस्त्यावर मोरांचा थवा अन्नपाण्याच्या शोधात नागरी वस्तीकडे आल्याचे नागरिकांनी पाहिले. तसेच मंचर शहरालगत असणाऱ्या तांबडे मळा परिसरात काळवीट आढळले आहे. विशेष म्हणजे मागील अनेक वर्षांपासून तालुक्यामध्ये एकही काळवीट नागरिकांनी पाहिले नव्हते. मात्र आता कडक उन्ह आणि अन्नपाण्याच्या कमतरतेमुळे काळवीटाच दर्शन नागरिकांना झाले आहे. काळवीट आणि मोरांच्या व्यतिरिक्त वानरांनी सुद्धा अन्न पाण्याच्या शोधात आपला मोर्चा जंगल वस्ती सोडून नागरी वस्तीकडे वळवला आहे. निसर्गातीन नैसर्गिक पाणीसाठे कोरडे पडल्याने प्राण्यांची पाण्याअभावी पायपीट होत आहे. त्यामुळे नागरिकांना सुद्धा प्राण्यांसाठी शक्य होईल त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करण्याच आवाहन मंचर वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

वनविभागाने अनेक ठिकाणी पाणवठे निर्माण केले आहेत. या पाणवठ्यामध्ये साधारण दहा ते पंधरा दिवसांनी पाणी सोडले जाते. पण कडक उन्हाळ्यामुळे जास्त काळ पाणी टिकू शकत नाही. आंबेगाव तालुक्यात अनेक सामाजिक संस्था कार्यरत आहे. तसेच अनेक दानशूर सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी जर वनविभागाचे अनेक पाणवठे दत्तक घेऊन त्यात पाणी तसेच अन्न पुरवले तर वन्यप्राण्यांची फरफट टाळता येईल. वन विभागाच्या पाणवठ्याला पाणी पुरवठा करण्याचे काम करण्याची इच्छा असणाऱ्या सामाजीक संस्था आणि दानशुर व्यक्तींनी मंचर वनपरिक्षेत्राशी संपर्क साधावा असे आवाहन मंचर वनपरिक्षेत्राधिकारी स्मिता राजहंस यांनी केले आहे. सध्या मंचर वनपरिक्षेत्रामध्ये अनेक प्रकारचे वन्य प्राणी आढळून येत आहेत. जसे की बिबट्या, तरस, लांडगे, सांबर, हरण, भेकर, ससा, मोर, वानर, माकड, असे अनेक प्राणी आढळून येत आहेत.