Lok Sabha Election 2024 – 30 लाख सरकारी नोकऱ्या! राहुल गांधीनी सांगितला प्लॅन

लोकसभा निवडणूक 2024 च्या मतदानाचा तिसरा टप्पा 7 मे रोजी पार पडला. उर्वरित 4 टप्प्यांसाठी मतदान होणे बाकी आहे. दरम्यान राजकीय पक्ष मतदारांना विविध आश्वासने देत आहेत. यामुळे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास पहिल्या 80 दिवसांत 30 लाख सरकारी नोकऱ्या दिल्या जातील, असे आश्वासन दिले आहे.

राहुल गांधी यांनी सोशल मीडिया X प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी मोदींच्या खोट्या प्रचाराने विचलित होऊ नका, भारताचे ऐका, द्वेष करू नका, तुमची नोकरी निवडा असे आवाहन केले आहे. “देशाची शक्ती आणि देशातील तरुण यांना मी सांगू इच्छितो की नरेंद्र मोदींच्या हातातून निवडणूक निसटत चालली आहे. ते आता पुन्हा भारताचे पंतप्रधान होणार नाहीत. येत्या चार-पाच दिवसांत काही नाट्य रचून तुमचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचे त्यांनी ठरवले आहे. आपण आपले लक्ष विचलित करू नका. देशात बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळे मोदींच्या बोलण्याला बळी पडू नका” असे राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी पुढे म्हाणले की, “नरेंद्र मोदींनी तुम्हाला सांगितले होते की ते 2 कोटी तरुणांना रोजगार देऊ. मात्र ते तुमच्याशी खोटे बोलले आहेत. त्यांनी नोटाबंदी केली, चुकीचा GST लागू केला आणि आत्तापर्यंत अदानी सारख्या लोकांसाठी सर्व कामे केली. भारतात 4 जूनला इंडिया आघाडीचे सरकार येईल. त्यानंतर भरती भरोसा या योजनेअंतर्गत ऑगस्टपर्यंत 15 ते 30 लाख तरुणांना रोजगार देण्याचे काम सुरू होईल, असे यावेळी राहुल गांधी यांनी सांगितले आहे.