IPL 2024 : 22 वर्षांच्या पोराने मुंबईला झुंजवल; तिलक वर्माचा एकाकी लढा, अखेर दिल्लीचा 10 धावांनी विजय

मुंबईच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा चाहत्यांची निराशा केली आहे. प्रथम गोलंदाजांचा दिल्लीच्या फलंदाजींनी चांगलाच समाचार घेतला. नंतर 258 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या फलंदाजांनी सुद्धा निराशाजनक खेळ केला. तिलक वर्मा पुन्हा एकदा संघासाठी धाऊन आला त्याने 32 चेंडूंमध्ये 4 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 63 धावांची खेळी केली. त्याला हार्दिक पंड्या (24 चेंडू 46 धावा) चांगली साथ दिली. मात्र ते संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. अटीतटीच्या लढतीत अखेर दिल्लीचा 10 धावांनी विजय झाला.

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात घरच्या प्रेक्षकांसमोर दिल्लीच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. नाणेफेक जिंकून मुंबईने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र Jake Fraser-McGurk या 22 वर्षीय ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने मुंबईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. जॅकने 27 चेंडूंमध्ये 6 षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने 84 धावांची वादळी खेळी केली. सलामीला आलेल्या अभिषेक पोरेलने (27 चेंडू 36 धावा) त्याला चांगली साथ दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 114 धावांची भागीदारी केली. त्यानंतर आलेले दिल्लीचे सर्वच फलंदाज मुंबईच्या गोलंदाजांवर तुटुन पडले. शे होप (17 चेंडू 41 धावा), रिषभ पंत (25 चेंडू 48 धावा) आणि अक्षर पटेल (6 चेंडू 11 धावा) यांच्या अमुल्य योगदानामुळे दिल्लीने मुंबईला 258 धावांचे लक्ष दिले होते.

लक्षाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबईच्या फलंदाजांनी चांगला खेळ करता आला नाही. तिलक वर्मा, हार्दिक पंड्या आणि टीम डेविड (17 चेंडू 37 धावा) या तीन खेळाडूं व्यतिरिक्त इतर कोणत्याच फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. इशान किशन (14 चेंडू 20 धावा), रोहित शर्मा (8 चेंडू 8 धावा), सूर्यकुमार यादव (13 चेंडू 26 धावा) हे मुंबईचे महत्वाचे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यामुळे मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला.