अदानी-अंबानीने काँग्रेसला पैसे दिल्याचे मोदींचे विधान बेजबाबदारपणाचे; डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचा पलटवार

उद्योगपती अदानी-अंबानी यांनी काँग्रेसला पैसे दिल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान बेजबाबदारपणाचे आहे. अंबानी-अदानी यांचे नरेंद्र मोदी यांच्याशी असलेले संबंध जगजाहीर आहेत. असे असताना राहुल गांधींकडे बोट करणे चुकीचे आहे. मोदी यांना तसे वाटत असेल तर त्यांनी खुशाल सीबीआय, ईडीकडून अदानी-अंबानींची चौकशी करावी म्हणजे सत्य बाहेर येईल, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी पलटवार केला.

टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना डॉ. भालचंद्र मुणगेकर पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांची धोरणे श्रीमंतधार्जिणी राहिलेली आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा एनपीए 66 लाख कोटी रुपये असून मोदी सरकाने मूठभर श्रीमंत लोकांची 16 लाख कोटी रुपयांची कर्जे माफ केलेली आहेत. नरेंद्र मोदींनी 20-22 उद्योगपतींचा फायदा केला, मात्र देशातील लाखो लोकांना पैसे देऊ अशी राहुल गांधी यांची भूमिका आहे. देशाची संपत्ती नरेंद्र मोदी हे श्रीमंतांना वाटतात, पण राहुल गांधी मात्र तोच पैसा गरीबांसाठी उपयोगात आणत आहेत. जनतेमध्ये राहुल गांधी व इंडिया आघाडीला पाठिंबा वाढत असल्याचे चित्र दिसताच मोदी राहुल गांधी यांचा ‘शहजादे’ असा उल्लेख करून त्यांची बदनामी करत आहेत. राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत अशी पाकिस्तानची इच्छा आहे हे मोदींचे विधान बदनामी करणारे आहे. पाकिस्तानचे निमंत्रण नसतानाही नरेंद्र मोदी हे मात्र नवाज शरीफ यांच्या घरी अचानक जाऊन बिर्याणी खातात, अशा शब्दांत त्यांनी टीका केली.