टी20 वर्ल्ड कपनंतर राहुल द्रविड प्रशिक्षक पद सोडणार? वाचा जय शहा काय म्हणाले

क्रीडाप्रेमींसाठी महत्त्वाचं वृत्त हाती आलं आहे. हिंदुस्थानचे क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) नवीन प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागवणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात BCCI चे सचिव जय शहा यांनी एक महत्त्वाचा खुलासा केल्याचं वृत्त क्रिकबझ या संकेतस्थळानं दिलं आहे.

या वृत्तानुसार ‘जय शहा यांनी सांगितलं की BCCI लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाच्या नव्या प्रशिक्षकासाठी जाहिरात प्रकाशित करणार आहे. जय शहा यांच्या या विधानामुळे हिंदुस्थानी संघाचा प्रशिक्षक असलेल्या राहुल द्रविडच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिलं आहे.

2021 च्या अखेरीस राहुल द्रविड यांनी हिंदुस्थानी संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारलं होतं. तेव्हापासून द्रविड हिंदुस्थानचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे.

‘राहुल द्रविड यांचा कार्यकाळ जूनपर्यंतच असल्यानं त्यांना प्रशिक्षकपदासाठी पुन्हा अर्ज करायचा असेल, तर ते करू शकतील’, असं जय शहा म्हणाले. नव्या मुख्य प्रशिक्षकांच्या निवडीनंतर त्यांच्याशी चर्चा करून अन्य सहाय्यक प्रशिक्षकांसंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचं कळतं आहे. ‘नवा प्रशिक्षक हिंदुस्थानी असावा की परदेशी हे आम्ही ठरवू शकत नाही’, असंही त्यांनी सांगितलं. प्रशिक्षक हिंदुस्थानी असावा की परदेशी हे क्रिकेट सल्लागार समितीवर अवलंबून आहे, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं.