अक्षय्य मुहूर्त…500 कोटींची उलाढाल होणार; घरासह वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे बुकिंग जोरात

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणे शुभ समजले जाते. अक्षय तृतीयेनिमित्त सराफा बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. शुक्रवारी दिवसभरात राज्यातील सराफा बाजारात सुमारे 500 कोटी रुपयांची उलाढाल होईल, असा अंदाज इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने वर्तवला. या शुभमुहूर्तावर रिअल इस्टेट क्षेत्रात देखील मोठी उलाढाल होणार असून अनेकांनी आपल्या स्वप्नातले घर बुक करण्याचे किंवा नव्या घरात गृहप्रवेश करण्याचे नियोजन केले आहे. याशिवाय वाहन, इलेक्ट्रॉनिक वस्तू यांचेही बुकाRग जोरात आहे.

मध्यंतरी सोन्याचे दर 75 हजारांपर्यंत पोहोचले होते. अक्षय्य तृतीयेच्या आधी सोन्याचे दर कोसळल्यामुळे खरेदीदारांमध्ये उत्साह आहे. गुरुवारी जीएसटीशिवाय सोन्याचे प्रति तोळा दर 71,502 रुपये होते. त्याचवेळी एक किलो चांदीचा दर 82,342 रुपयांवर होता. शुक्रवारी या दरात किंचित बदल होईल, असा अंदाज सराफांनी वर्तवला आहे.

अक्षय्य तृतीयेला बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण असून  कोटयवधींची उलाढाल होणार आहे. मुहूर्ताच्या दिवशी आपल्याला वस्तू मिळाव्यात यासाठी अनेकांनी आदल्या दिवशी म्हणजेच गुरुवारीच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे बुकिंग केले. घर खरेदीकडे असणारा कल पाहता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी भरघोस ऑफर्स देऊ केल्या आहेत.

अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी केल्यास पुढील वर्षी तुम्हाला 20 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो. त्यामुळे गुंतवणूक म्हणून सोने खरेदीला ग्राहकांचे प्राधान्य आहे.

कुमार जैन, प्रवक्ते, इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन