निलंबन, सरावासाठी निधी अन् सराव दौरा रद्द, बजरंग पुनिया प्रकरणाचा सावळा गोंधळ

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी तत्कालीन राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध शड्डू ठोकणारा ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया काही दिवसांपासून पुन्हा चर्चेत आला आहे. डोपिंग टेस्ट न दिल्याने राष्ट्रीय उत्तेजकविरोधी संस्थेकडून (नाडा) निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या या कुस्तीपटूवर आता युनायटेड वर्ल्ड रेसलिंक (यूडब्ल्यूडब्ल्यू) संघटनेही वर्षअखेरपर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. तरीही हिंदुस्थान क्रीडा प्राधिकरणने (साई) बजरंग पुनियाच्या परदेशातील सरावासाठी निधी मंजूर केला आहे, मात्र बजरंगने या बंदीच्या कारवाईमुळे परदेशात सरावासाठी जाण्याचा निर्णय रद्द केला आहे. त्यामुळे एकूण या कुस्तीपटूच्या प्रकरणाचा सध्या सावळागोंधळ सुरू असलेला दिसतोय.

टोकियो ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता बजरंग पुनियाच्या म्हणण्यानुसार मी डोपिंग चाचणीला विरोध केला नव्हता. मला मुदत संपलेली किट चाचणीसाठी देण्यात आली होती म्हणून आपण डोपिंग टेस्ट दिली नव्हती. दुसरीकडे ‘नाडा’च्या कारवाईनंतर ‘यूडब्ल्यूडब्ल्यू’ अर्थात जागतिक संघटनेनेही बजरंगवर 31 डिसेंबर 2024 पर्यंत कुस्ती खेळण्यास बंदी घातली आहे, मात्र निलंबनाबाबत आपल्याला ‘यूडब्ल्यूडब्ल्यू’कडून अद्याप काहीच कळविण्यात आले नसल्याचे बजरंगचे म्हणणे आहे. मात्र ‘यूडब्ल्यूडब्ल्यू’च्या संकेतस्थळावर बजरंगच्या नावापुढे ही बंदीची कारवाई झालेली स्पष्टपणे दिसत आहे.

‘साई’कडून सरावासाठी 8 लाख 82 हजार मंजूर

बजरंग पुनियावर ‘नाडा’ने 23 एप्रिलला निलंबनाची कारवाई केली. या कारवाईमुळे त्याच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. मात्र त्यानंतर 25 एप्रिलला मिशन ऑलिम्पिक सेलच्या (एमओसी) बैठकीत बजरंग पुनियाच्या रशियातील सरावासाठी 8 लाख 82 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. रशियातील दागेस्तान येथील 35 दिवसांच्या सराव दौऱयासाठी ‘साई’ने बजरंगला 28 एप्रिलपासून मंजुरी दिली होती. खरं तर बजरंग 24 एप्रिललाच रशियाला जाणार होता, मात्र पॅरिस ऑलिम्पिकची पात्रता मिळविण्या अपयश आल्याने त्याने हा सराव दौरा पुढे ढकलला होता, मात्र आता त्याने हा परदेशातील सराव दौराच रद्द केला आहे. ‘साई’कडून परदेश दौऱयासाठी निधी मंजूर झाल्याने आपण चकित झालोय, असे बजरंग पुनियाने सांगितले. शिवाय ‘नाडा’कडून झालेल्या निलंबनाच्या कारवाईला माझ्या वकिलांनी ‘नाडा’ला उत्तर दिले आहे, असेही बजरंगने सांगितले.