मी कधीच त्यांच्यासोबत जाणार नाही; मोदींच्या ऑफरचा समाचार घेत शरद पवार यांची सडकून टीका

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ऑफरचा खरपूस समाचार घेतला आहे. एवढचं नव्हे तर शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप आणि आरएसएसला फैलावर घेतलं.

एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत शरद पवार यांनी यावं, अशी ऑफर पंतप्रधान मोदी यांनी दिली. नंदुरबारमध्ये पंतप्रधान मोदी यांची प्रचार सभा झाली. त्यावेळी त्यांनी शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासोबत आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंसोबत यावं, अशी ऑफर दिली. ही ऑफर धुडकावून लावत शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधत पंतप्रधान मोदींचा समाचार घेतला.

आज देशात संसदीय लोकशाही पद्धती ही मोदींमुळे संकटात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल किंवा झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक करून तुरुंगात टाकण्यात आलं. केंद्रीय नेतृत्व आणि केंद्र सरकारचा सहभाग असल्याशिवाय हे होऊच शकत नाही. लोकशाही पद्धतीवर कुणाचा कितपत विश्वास आहे, हे यावरून स्पष्ट होतं. ज्या व्यक्तीचा, धोरणाचा, पक्षाच्या विचारधारेचा संसदीय लोकशाहीवर विश्वासच नाही, असा समज लोकांमध्ये पक्का झालेला असेल, त्यांच्यासोबत व्यक्तीगत सोडा, राजकीय स्तरावर मी कधीच जाणार नाही, असं म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर एकाचवेळी निशाणा साधला.

राज्यात महाविकास आघाडीला 35 जागा मिळतील; शरद पवार यांनी व्यक्त केला विश्वास

गांधी, नेहरूंची विचारधारा आम्ही स्वीकारलेली आहे. गांधी, नेहरूंची विचारधारा ही एखाद्या समाजविरोधात नाही. मोदींनी अलिकडेच एक वक्तव्य केलं. आणि त्यात त्यांनी मुस्लिम समाजाचा वेगळा उल्लेख केला. हा देश एकजूट ठेवायचा असेल तर इथे हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जैन या सर्वांना एकत्र करून हा देश पुढे न्यावा लागेल. फक्त एका धर्मियांबाबत आपण वेगळी भूमिका मांडायला लागलो, तर समाजात ऐक्य राहणार नाही. अविश्वासाचं वातावरण निर्माण होईल. आणि मोदींची अलिकडची सगळी भाषणं ही समाजा-समाजात गैरसमज निर्माण करायला पोषक आहेत. देशाच्या दृष्टीने ते घातक आहेत. जे देशाच्या हिताचं नाही तिथे मी आणि माझे सहकारी असणार नाहीत, अशी स्पष्ट भूमिका मांडत शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली.

लोकसभा निवडणुकीत जे काही दोन तीन टप्पे झालेत ते पाहता आणि स्थिती बघता मतदारांमध्ये मोदींच्या विरोधात जनमत व्यक्त होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आणि त्यामुळे मोदी अस्वस्थ आहेत. त्यांची अस्वस्थता ही अलिकडच्या विधानांवरून समोर येत आहे. किंवा संभ्रम निर्माण करण्याचा ते प्रयत्न करत आहेत, असा टोला शरद पवार यांनी लगावला.

तीन टप्प्यांचं मतदान हे मोदींना अस्वस्थ करणारं; शरद पवार यांचं मोठं भाकित

एससी, एसटी यांचं आरक्षण वाढवायचं असेल तर आमचा काही विरोध नाही. अवश्य वाढवा. पण एखाद्या समाजासंबंधी राज्यकर्त्यांनी अशी कशी भूमिका घेऊन चालेल? पंतप्रधान हे देशाचे असतात. जो एका देशाचं नेतृत्व करतो त्याने एका धर्माचं, जातीचा विचार करण्यास सुरुवात केली तर देशाचं ऐक्य संकटात येईल. मग ते पंतप्रधान असो की त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री असो, असा गंभीर इशारा शरद पवार यांनी दिला. अमित शहा यांनी मुस्लिम आरक्षणाविरोधात केलेल्या वक्तव्यावर शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली.