एअर इंडिया एक्प्रेसच्या कर्मचाऱयांचे आंदोलन मागे; 25 कर्मचारी पुन्हा कामावर

air india express

टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडिया एक्स्प्रेसमधील  तब्बल 300 क्रू मेंबर्सनी पुकारलेले सामूहिक रजा आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी काढून टाकलेल्या 25 कर्मचाऱयांना पुन्हा कामावर घेतले. मात्र बुधवारी सायंकाळपासून पुकारलेल्या आंदोलनामुळे विमान उड्डाणांचा आज सलग दुसऱया दिवशीही प्रचंड खोळंबा झाला. गुरुवारी तब्बल 85 हून अधिक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली, तर मंगळवारी सायंकाळपासून 170 विमान उड्डाणांवर परिणाम झाला. मुख्य कामगार आयुक्तांच्या कार्यालयात कर्मचारी संघटना आणि पंपनी व्यवस्थापनाची बैठक झाली. या बैठकीतील चर्चेनंतर कर्मचाऱयांनी आंदोलन मागे घेतले.

तब्बल पाच तास बैठक चालली. यावेळी एअर इंडिया एक्स्प्रेस कर्मचारी संघटनेचे आणि भारतीय मजदूर संघाचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. बैठकीनंतर भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय सचिव गिरीश चंद्र आचार्य यांनी काढून टाकलेल्या 25 कामगारांना पुन्हा कामावर घेतल्याचे पत्रकारांना सांगितले.

कर्मचाऱयांच्या तुटवडय़ामुळे आणखी काही दिवस प्रवाशांना त्रास सहन करावा लागेल. पंपनी विमान उड्डाणांची संख्या कमी करेल. आधीच नियोजित उड्डाणेही कमी करावी लागतील.

आलोक सिंह, सीईओ, एअर इंडिया एक्स्प्रेस

कंपनीने बजावली नोटीस

कंपनीने सर्व कर्मचाऱयांना नोटीस बजावली आहे. अशा प्रकारे अचानक सामूहिक रजा घेणे कायद्याच्या विरोधात असून या आंदोलनामुळे मोठय़ा संख्येने उड्डाणे रद्द करावी लागली. उड्डाणांचे संपूर्ण वेळापत्रक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाल्याचे पंपनीने नमूद केले आहे