आश्वासने पूर्ण केली नाहीत म्हणून पाटणामध्ये मोदींचा रोड शो; मिसा भारती यांचा जोरदार हल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा बिहार दौऱयावर जात असून 12 मे रोजी पाटणा येथे त्यांचा रोड शो आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर 13 मे रोजी तीन सभांचेही आयोजन करण्यात आले आहे. मोदींच्या या दौऱयावरून राष्ट्रीय जनता दलाचे सर्वोसर्वा लालूप्रसाद यादव यांची मोठी कन्या मिसा भारती यांनी आज जोरदार हल्ला चढवला. मोदींनी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत म्हणूनच त्यांना आता पाटणामध्ये रोड शो करावा लागतोय, अशा शब्दांत मिसा भारतीय यांनी मोदींवर निशाणा साधला. मिसा भारती या पाटलीपुत्र येथून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

पहिल्यांदाच नरेंद्र मोदी यांना पाटणामध्ये रोड शो करण्याची गरज पडतेय. बिहारच्या 40 जागांवर भाजपाचा एकही उमेदवार ना आपल्या चेहऱयावर लढतोय ना आपली कामे समोर ठेवून लढतोय, असा आरोपही मिसा भारती यांनी केला. मोदींना आता आपला चेहरा दाखवूनही लढता येणार नाही. आता तर असे वाटतेय की, सरपंचाच्या निवडणुकीसाठीही मोदींना रोड शो करावा लागेल, असा टोलाही मिसा भारती यांनी लगावला.