हिंदुस्थानला मोठं यश, इराणने इस्रायलच्या जहाजातून ओलीस ठेवलेल्या पाच खलाशांची केली सुटका

हिंदुस्थानच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. इराणने इस्रायली मालवाहू जहाजातून ओलीस ठेवलेल्या पाच हिंदुस्थानी खलाशांची गुरुवारी सुटका करण्यात आली. इराणमधील हिंदुस्थानी दूतावासाने ही माहिती दिली. त्यांच्या सुटकेची माहिती देताना हिंदुस्थानी दूतावासाने इराणी अधिकाऱ्यांचे, बंदर अब्बासमधील दूतावास आणि हिंदुस्थानच्या वाणिज्य दूतावास यांच्याशी जवळून समन्वय साधल्याबद्दल आभार मानले आहेत.

इराणने इस्रायली मालवाहू जहाजातून ओलीस ठेवलेल्या पाच हिंदुस्थानी खलाशांची सुटका केली आहे. काही दिवसांपूर्वी इस्रायली नागरिकाच्या मालकीचे जहाज इराणने होर्मुझच्या आखातातून ताब्यात घेतले होते.त्यावेळी एमएससी एरीज(MSC Aries) या इस्रायली मालवाहू जहाजावर 25 कर्मचारी होते, त्यापैकी 17 हिंदुस्थानी होते. या घटनेनंतर एकच खळबळ माजली होती. त्यांच्या सुटकेसाठी हिंदुस्थानने इराणशी द्विपक्षीय स्तरावर बोलणी सुरू केली होती. या चर्चेला हळूहळू यश आले असून जहाजावरील पाच हिंदुस्थानी खलाशांना सोडून देण्यात आले आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात एका महिला कर्मचाऱ्याची सुटका करण्यात आली होती.

सूत्रांच्या माहितीनुसार, सर्व हिंदुस्थानी आधी जहाजाने बंदरात पोहोचतील आणि नंतर तेहरानला येतील. त्यानंतर त्यांची प्रवासाची कागदपत्रे दिली जातील. हिंदुस्थानी दूतावास त्यासाठी मदत करेल आणि त्यानंतर ते सर्व मायदेशी परततील. इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीराब्दुल्लाहियन यांनी सांगितले की, इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने संयुक्त अरब अमिरातीहून (यूएई) हिंदुस्थानकडे येणाऱ्या मालवाहू जहाजाचा ताबा घेतल्यानंतर आता इस्रायलशी संबंधित जहाजातील सर्व कर्मचाऱ्यांना देशाने सोडले असल्याचे सांगितले.