नीरजची ‘मिशन ऑलिम्पिक’ची तयारी आजपासून

हिंदुस्थानला भालाफेकीत सुवर्ण पदक जिंकून देणारा ऑलिम्पिकवीर नीरज चोप्रा दोहा डायमंड लीगच्या एकदिवसीय पहिल्या टप्प्यापासून आपल्या मिशन ऑलिम्पिकला सुरुवात करणार आहे. ही प्रतिष्ठsच्या लीगचा पहिला टप्पा उद्या शुक्रवारपासून सुरू होत असून यात माजी जगज्जेता ग्रेनाडाचा अॅण्डरसन पीटर्स आणि ऑलिम्पिक तसेच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचा पदक विजेता झेक प्रजासत्ताकचा याकूब वालेश यांच्याशी त्याची गाठ पडणार आहे. त्याचप्रमाणे आशियाई स्पर्धेत रौप्य जिंकणारा किशोर जेनासुद्धा डायमंड लीगमध्ये पदार्पण करेल. गतविजेता वालेश आणि पीटर्सला 2023 च्या लीगमध्ये नीरजने हरवण्याची किमया केली होती. आताही नीरजने तेच ध्येय डोळय़ासमोर ठेवले आहे. या लीगच्या पहिल्या टप्प्यात 90 मीटरचे स्वप्न साकारण्यासाठीही तो प्रयत्न करणार आहे. त्याला वालेश, पीटर्ससह युरोपियन चॅम्पियन जर्मनीच्या ज्युलियन वेबरचेही आव्हान असेल. या लीगचा दुसरा टप्पा 19 मे रोजी मोरोक्को येथे असेल.