मोदींना त्यांचा पराभव दिसतोय! पंतप्रधानांनी दिलेल्या ऑफरवर संजय राऊत यांची खणखणीत प्रतिक्रिया

Lok Sabha Election 2024: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पहिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑफरवर खणखणीत प्रतिक्रिया दिली आहे. ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे कोणत्याही प्रकारचा स्वाभिमान बाजूला ठेऊन आणि राष्ट्रहिताचा बळी देऊन नरेंद्र मोदी यांच्यासारख्या बाजूला जातील कुणी याचा विचार स्वप्नातही करणार नाही. मोदींना समोर त्यांचा पराभव दिसतोय’, असं संजय राऊत म्हणाले .

‘मोदी हा एक लटकता आत्मा आहे. इकडे तिकडे लटकत फिरतो आहे. या लटकत्या आत्म्यासोबत आमच्या महाराष्ट्राचे पवित्र आत्मे कधीही जाणार नाहीत, असं संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं. मोदी यांनी कळत नाही ते कुठे लटकता आहेत. त्यांची वक्तव्य पहा आज एक, काल एक, उद्या एक, त्यांची प्रकृती बरी नसावी असं मला वाटतं. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची प्रकृती तपासावी, त्यांना उपचार आणि विश्रांतीची गरज आहे. म्हणून ते अशी विधानं करत आहेत, अशा शब्दात राऊत यांनी सुनावलं आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदींचा स्वप्नभंग 4 जून नंतर होत आहे, की आपण परत सत्तेवर येऊ. आमची स्वप्न मोदी काय पूर्ण करणार? गेल्या 10 वर्षात नरेंद्र मोदी यांच्या राज्यकारभाराने देशाच्या स्वप्नाची वाट लावली आहे. मोदींना सत्तेवरून खाली खेचायचं हे आमचं स्वप्न आहे. या देशातील हुकूमशाहीचा पराभव करायचा. या देशातील सविधान वाचवायचं’, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

शरद पवार यांना समजून घेण्यासाठी मोदींना 100 जन्म घ्यावे लागतील. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसारखे पक्ष काँग्रेसमध्ये विलिन होतील असं कुठेही म्हटलं नाही. त्यांनी भविष्यातील एक भूमिका सांगितली की काही लहान पक्ष असतात त्यासंदर्भात बोलले. काँग्रेस भविष्यात मजबूत पक्ष होईल आणि देशाचं नेतृत्व करेल त्यासंदर्भात शरद पवार बोलले. पण मोदींना त्यासाठी भारतीय पक्षाचा जो बुद्ध्यांक असतो तो रुपयाप्रमाणे खाली घसरला आहे. त्यातून मोदी अशी वक्तव्य करताहेत. मोदी हे पराभूत मनोवृ्त्तीतून बोलताहेत, असं राऊत म्हणाले.

अशा प्रकारची ऑफर देणं हा बालिशपणा आहे. अशा प्रकारची ऑफर करणाऱ्या माणसाची बुद्धी ही काय तोलामोलाची आहे हे तपासून पाहायला पाहिजे.

‘आमच्या स्वप्नाला हातभार लावून पंतप्रधान मोदी सत्तेवरून पायउतार होत असतील, तर आम्ही त्यांचं स्वागत करू’, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

मोदींची दुटप्पी भूमिका!

पंतप्रधान मोदींच्या संभाजीनगरचे नेते अंबादास दानवे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘मला वाटतं की, लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव अटळ आहे. म्हणून पंतप्रधान मोदी आता अशा प्रकारच्या ऑफर देत आहेत’, असं अंबादास दानवे म्हणाले.

‘आधी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणायचं. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका करायची आणि नंतर त्यांनाच एनडीएमध्ये सहभागी होण्याची ऑफर द्यायची. ही मोदींची दुटप्पी भूमिका आहे’, असंही ते म्हणाले.