…तर मुंबई 2022 ची पुनरावृत्ती करणार

यंदा मुंबईचा आयपीएलमधला बाजार सर्वप्रथम उठलाय. निराशाजनक कामगिरीमुळे मुंबईने गुणतालिकेचा तळ राखला आहे. जर मुंबईच्या कामगिरीत सुधारणा झाली नाही तर मुंबई 2022 सालची अपयशाच्या निचांकाची बरोबरी साधू शकतो. ती टाळायची असेल तर मुंबईला कोलकाता आणि लखनऊविरुद्धचे सामने जिंकावेच लागणार. यातही मुंबईच्या पदरी अपयश पडले तर मुंबईसाठी ही आजवरची सर्वात खराब कामगिरी ठरेल.

मुंबईसाठी 2022 सालचा मोसम सर्वात खराब गेला होता. याच वर्षी मुंबई चक्क 10 सामन्यांत हरला आणि दहाव्या स्थानावर घसरला होता. आयपीएलच्या इतिहासात मुंबई प्रथमच तळाला पोहोचली होती. मात्र गेल्या वर्षी मुंबईने प्ले ऑफ गाठून आपले अपयश पुसून काढले, पण ते अंतिम फेरीत पोहोचू शकले नाहीत. मुंबईचा संघ या वर्षी वारंवार नवव्या आणि दहाव्या स्थानावर आंधळी कोशिंबीर खेळतोय. पुढच्या दोन्ही सामन्यांत विजय मिळवला तर मुंबई किमान सहा ते आठ या क्रमांकावर स्थिरावू शकतो. मुंबईच्या दारुण अपयशाला हार्दिक पंडय़ाचे नेतृत्व कारणीभूत ठरले आहे. रोहित शर्माला तडकाफडकी काढणे, क्रिकेटप्रेमींना न पटल्यामुळे त्यांनी पंडय़ाची वारंवार खिल्ली उडवत आपला संताप व्यक्त केला आहे. त्यातच रोहित शर्माचे अपयशही मुंबईसाठी घातक ठरल्याचे बोलले जात आहे.

2021 पासून मुंबईची सुरू झालेली अपयशाची मालिका 2022 ला तळाला पोहोचली होती. गेल्या वर्षी कामगिरीत काहीशी सुधारणा झाली, पण ती कामगिरी मुंबईच्या लौकिकास साजेशी नव्हती. आयपीएलच्या 17 मोसमात मुंबईने चक्क दहावेळा प्ले ऑफ गाठले आणि पाचवेळी जेतेपदाचा आयपीएलही उंचावला आहे. मुंबईला 2022 मध्ये सर्वात मोठय़ा दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. तसेच 2009 आणि 2018 साली मुंबईला आठ सामन्यांत पराभवाची झळ बसली होती. आताही 12 सामन्यांत 8 सामने हरले आहेत. यापेक्षा चांगली कामगिरी करण्यासाठी मुंबईला उर्वरित दोन्ही सामन्यांत यशाला खेचून आणावे लागेल. अन्यथा मुंबईला 2022 प्रमाणे मुंबईचा नव्हे तर तळाचा राजा म्हणून अपमान सहन करावा लागेल.

मुंबईचे चारवेळा प्ले ऑफ हुकलेय

मुंबईने सतरापैकी दहावेळा प्ले ऑफ गाठलेय तर पाचवेळा प्ले ऑफ हुकले आहे. म्हणजे सातपैकी चारवेळी मुंबईला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. 2021 साली मुंबईचे प्ले ऑफ निव्वळ नेट रनरेटमुळे हुकले होते.