भरपोट मोफत पोहे, जिलेबी खा, मेट्रो-चित्रपटांवर भरघोस सूट घ्या; मतदान वाढीसाठी प्रशासनाकडून सवलतींचा वर्षाव

Lok Sabha Election 2024: देशात लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे झाले असले तरी मतदानाची टक्केवारी मात्र समाधानकारक नसल्यामुळे प्रशासन सक्रिय झाले आहे. मतदान वाढीसाठी व्यापाऱयांच्या मदतीने स्थानिक प्रशासनाने विविध सवलतींचा वर्षाव मतदारांवर करायला सुरुवात केली आहे. कुठे मोफत पोहे, जिलेबी खा तर मुंबईत मेट्रो तिकिटांवर तर गुरुग्राममध्ये चित्रपटांच्या तिकिटांवर भरघोस सूट देण्यात आली आहे. दिल्लीकरांना भरपगारी रजा जाहीर करण्यात आली आहे.

देशात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या, दुसऱया आणि तिसऱया टप्प्यात मतदान केवळ 55 ते 60 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. अजूनही मतदारांमध्ये निरुत्साह असल्यामुळे आता प्रशासनाच्या वतीने विविध सवलतींचा वर्षाव करण्यात येणार आहे. निवडणुकीचा चौथा टप्पा 13 मे तर पाचवा टप्पा 20 मे रोजी पार पडणार आहे. यावेळी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी देशभरात विविध शहरात स्थानिक प्रशासनाने विविध योजना जारी केल्या आहेत.

दिल्लीकरांना मिळणार भरपगारी रजा

दिल्लीत सहाव्या टप्प्यात होणाऱया मतदानासाठी सरकारी, निमसरकारी आणि खासगी कर्मचाऱयांनाही भरपगारी रजा जाहीर करण्यात आली आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनातर्फे ही शक्कल लढवण्यात आली आहे.

मुंबईत मेट्रोच्या तर गुरुग्राममध्ये तिकिटांवर सूट

पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. यावेळी मतदान केल्यानंतर मेट्रोच्या काही मार्गांवर मेट्रो प्रशासनाने मतदारांना तिकिटांवर 10 टक्के सूटची ऑफर जाहीर केली आहे. गुरुग्राममध्ये 25 मे रोजी मतदान होणार आहे. यावेळी मतदान केलेल्यांना मल्टिप्लेक्सच्या तिकिटांवरील स्नॅक्सवर सूट देण्यात आली आहे.

मोफत खा पोहे-जिलेबी

मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये 13 मे रोजी चौथ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. यावेळी मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी बस प्रवाशांना तीन दिवस मोफत प्रवासाची ऑफर आहे तर काही ठिकाणी मतदान पेंद्रांवर मोफत टी शर्ट आणि टोपीसाठी लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला आहे. व्यापारी संघांनी मतदार केल्यानंतर मोफत पोहे आणि जिलेबी देणार असल्याचे जाहीर केले आहे.