T-20 World Cup 2024 : आपल्या मनाला वाटेल त्या स्पर्धा तो खेळू शकत नाही, इरफान पठाण भडकला

जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी पुढील काही दिवसांमध्ये टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघाची निवड केली जाणार आहे. त्यामुळे टीम इंडियाचे अनेक माजी खेळाडू संघ निवडीसंदर्भात आपापली मत मांडत आहेत. अशातच इरफान पठाण मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्यावर चांगलाच भडकला आहे. हार्दिकला आगामी विश्वचषकासाठी महत्व देण्याची गरज नसल्याचे मोठे वक्तव्य त्याने केले आहे.

इरफान पठाण स्टार स्पोर्ट्सच्या ‘Press room show, ticket to world cup’ मध्ये बोलत असताना त्याने आपले परखड मत व्यक्त केले. “हार्दिक पंड्याच्या संदर्भात बोलायचे झाले तर, त्याला आतापर्यंत जितके महत्व हिंदुस्थानी क्रिकेटने दिले ते देण्याची आता गरज नाही. जर तुम्हाला वाटतय की तुम्ही एक अष्टपैलू खेळाडू आहात. तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यापद्धतीचा खेळ करणे सुद्धा गरजेचे आहे. अष्टपैलू खेळाडूंचा विचार केला तर हार्दिकने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी खेळ केलेला नाही. आपण फक्त त्याच्या क्षमतेचा विचार करत आहोत,” असे म्हणत इरफान पठाणने हार्दिक पंड्यावर बोचरी टीका केली आहे.

“आपण आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय कामगिरी यामध्ये गोंधळून जातो. पण दोघांमध्ये खूप फरक आहे. सर्व प्रथम त्याला वर्षभर खेळावे लागेल. तो आपल्या मनाला वाटेल त्या स्पर्धा खेळू शकत नाही,” असे म्हणत इरफान पठाणने हार्दिकला मोलाचा सल्ला दिला आहे.