राज्य सेवा पूर्व परीक्षा आता 6 जुलैला

राज्य सेवा पूर्व परीक्षेबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शुद्धिपत्रक जारी केले असून राज्य सेवा पूर्व परीक्षेची सुधारित तारीख जारी करण्यात आली आहे. त्यानुसार ही परीक्षा आता 6 जुलैला होणार आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी 21 डिसेंबर रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. 274 पदांसाठी 28 एप्रिल 2024 रोजी परीक्षा होणार होती. परंतु राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला आणि स्वतंत्र 10 टक्के आरक्षण जाहीर केले. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागासवर्गाकरिता आरक्षण निश्चिती करून सुधारित मागणीपत्र पाठविण्याबाबत सरकारला कळविण्यात आलेले असून आयोगाच्या 21 मार्च 2024 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रस्तूत परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार आता शनिवार 6 जुलै रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे. राज्यसेवा परीक्षेमार्फत एकूण 431 पदे भरायची आहेत. यात उपजिल्हाधिकारी गट अ 7 पदे, सहाय्यक राज्य कर आयुक्त, गट-अ 116 पदे, गटविकास अधिकारी, गट-अ 52 पदे, सहाय्यक संचालक- 43 पदे, सहाय्यक आयुक्त/ प्रकल्प अधिकारी-3 पदे अशा 524 पदांचा सुधारित तपशील शुद्धिपत्रकात देण्यात आलेला आहे.