आदर्श आचारसंहिता आता ‘मोदी आचारसंहिता’ बनली आहे; ममता बॅनर्जी यांचा पंतप्रधानांवर घणाघात

भाजपा नेत्यांकडूनच निवडणूक प्रचारा दरम्यान द्वेष पसरवला जात असून निवडणूक आयोगानेच याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहिता ही आता मोदी आचारसंहिता बनली आहे, अशा शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघात केला.

पुरुलिया येथील निवडणूक प्रचारसभेला त्यांनी संबोधित केले. नरेंद्र मोदी आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते केवळ स्वतःलाच हिंदू मानतात आणि इतर समुदायांबद्दल विचारच करत नाहीत, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. मोदी आणि भाजपाचे नेते द्वेषपूर्ण भाषणे करून हिंदू, अल्पसंख्याक आणि इतर मागासवर्गीय समाजाच्या लोकांना धमकावत आहेत, घाबरवत आहेत, पण निवडणूक आयोग मात्र गप्प आहे, असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला.

मोदी खोटारडे

मोदी सातत्याने खोटे बोलत आहेत. प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये टाकण्याच्या त्यांच्या आश्वासनाचे काय झाले? स्वयंपाकाचा गॅस मोफत देण्याच्या त्यांच्या आश्वासनाचे काय झाले? बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेचे काय झाले? असे सवालही ममता बॅनर्जी यांनी भर सभेत केले.

गरीब मजुरांची 100 दिवसांची मजुरी रोखली

भाजपा नेत्यांनी प्रत्येक गावात अन्नपूर्णा भंडार योजने अंतर्गत प्रत्येक गरीब महिलेला
3 हजार रुपये देण्याचे खोटे आश्वासन दिल्याचा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला. भाजपाने बंगालमधील गरीबांना मिळणारी 100 दिवसांची मजुरी तब्बल तीन वर्षांपासून रोखल्याचा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला. दरम्यान, भाजपाने मतांसाठी आदिवासींना रोख पैसे देऊ केल्याचा आरोपही ममता बॅनर्जी यांनी बांकुडा जिह्यातील विष्णुपूरमधील प्रचारसभेत केला.