मोदींच्या धोरणांमुळे भेदभावाने गाठली अभूतपूर्व पातळी, सोनिया गांधी यांनी डागली तोफ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेतू आणि नीतीधोरणांमुळेच आदिवासी, दलित, गरीब आणि अल्पसंख्याकांमध्ये भेदभावाने अभूतपूर्व पातळी गाठली आहे. सर्वसमावेशकता आणि संवाद नाकारून त्यांना सत्ता स्थापन करायची आहे, अशा शब्दांत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर तोफ डागली आहे. खोटे आणि द्वेषाचे राजकारण करणाऱयांना नकार देऊन देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी काँग्रेस आणि इंडिया आघाडीला मत द्या, असे आवाहनही त्यांनी एका व्हिडीओ संदेशाद्वारे केले.

काँग्रेस आणि इंडिया आघाडी लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी वचनबद्ध असल्याचेही सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. काँग्रेसला साथ देऊन सर्वांसाठी शांतता आणि सौहार्द असलेला एकसंध भारत निर्माण करू या, असे आवाहनही सोनिया गांधी यांनी केले आहे. देशाची राज्य घटना आणि लोकशाही धोक्यात असून देशातील गोरगरीब जनता मागेच राहिली आहे. त्यामुळे समाजाची जडणघडण होत नाही ही वस्तुस्थिती अत्यंत विदारक असून आज पुन्हा एकदा पाठिंबा देण्याची विनंती करत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. देश एकत्र ठेवणे, गोरगरीब, तरुण, महिला, शेतकरी, कामगार आणि वंचित समुदायांसाठी काम करणे, हे आमच्या न्याय पत्र आणि गॅरंटीचे उद्दिष्ट आहे, असेही त्यांनी नमूद केले.