‘बेस्ट’मध्ये दोन वर्षांत पाच हजार एसी बस

मुंबईत 9 मे 1874 मध्ये सुरू झालेल्या ‘बेस्ट’च्या ऐतिहासिक प्रवासाला उद्या 9 मे 2024 रोजी तब्बल 150 वर्षे होत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘बेस्ट’च्या आणिक आगारात ‘बेस्ट’चा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी इतिहास प्रदर्शनाच्या माध्यमातून उलगडणार आहे. या दिवसाच्या निमित्ताने पुढील दोनच वर्षांत बेस्टमध्ये सर्व पाच हजार एसी बस येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास गारेगार होणार आहे.

मुंबईत 9 मे 1874 रोजी कुलाबा ते पायधुनी व्हाया क्रॉफर्ड मार्पेट आणि बोरीबंदर ते पायधुनी व्हाया काळबादेवी असा बस मार्ग सुरू झाल्या. यानंतर गेल्या दीडशे वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने ‘बेस्ट’ प्रवाशांची पहिली पसंती पडली. सद्यस्थितीत रेल्वेनंतर ‘बेस्ट’ ही मुंबईची ‘लाइफलाइन’ बनली आहे. सद्यस्थितीत बेस्टच्या दररोजच्या प्रवाशांची संख्या 32 ते 35 लाखांपर्यंत गेली आहे, तर आगामी काळात बसेसची संख्या वाढणार असून पर्यायाने प्रवाशांना सुविधाही वाढल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची संख्याही वाढणार असल्याचे ‘बेस्ट’ प्रशासनाने स्पष्ट केले. दरम्यान, बेस्टच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आणिक आगारत बेस्टचा इतिहास उलगडणारे मोफत प्रदर्शन 9 ते 11 मे या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार आहे.

रेल्वेनंतर मुंबईची दुसरी लाइफलाइन असलेल्या ‘बेस्ट’ प्रवाशांची दररोजच्या प्रवाशांची संख्या 32 ते 35 लाखांवर गेली आहे. ‘बेस्ट’च्या ताफ्यात सध्या 3038 बस आहेत. यातील अनेक बस त्यांची कालमर्यादा संपल्याने व्रॅबमध्ये जात असतात. या वर्षी किमान 500 बस बाद होणार आहेत. त्यामुळे नव्या एसी बस आणल्या जाणार आहेत. या गाडय़ांचे तिकीटही माफक असल्याने मुंबईकरांना फायदा होणार असून इलेक्ट्रिक गाडय़ांमुळे पर्यावरण संवर्धनास हातभार लागणार आहे.

असा आहे सध्याचा ताफा

एकूण बस ….  3038

बेस्टच्या गाडय़ा 1097

भाडेतत्त्वावरील  1941